Mumbai Covid-19 Vaccination: लसीकरणाबाबत मुंबईचा नवा विक्रम; 100 टक्के प्रौढ लोकसंख्येला मिळाला लसीचा पहिला डोस
Vaccine | Representational Image | (Photo Credits: Flickr)

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी (Mumbai) शनिवारी एक आनंदाची बातमी घेऊन आला. लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ 10 महिन्यांनी मुंबईमध्ये 100 टक्के प्रौढ लोकसंख्येला म्हणजेच 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) सांगण्यात आले की, शहरातील एकूण प्रौढ लोकसंख्या 92 लाख 36 हजार 546 असून, दुपारी 4 वाजेपर्यंत येथे 92 लाख 50 हजार 555 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. यासह, मुंबई हे देशातील पहिले मेट्रो शहर बनले आहे, जिथे 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

बीएमसीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मुंबईत लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढून 59 हजार 83 हजार 452 झाली आहे. हे एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 65% आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईत 92 लाख 35 हजार 708 लोकांना म्हणजेच 99.99 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला होता. शनिवारी 838 डोस दिल्यानंतर मुंबईने 100 टक्क्यांचा टप्पा ओलांडला. बीएमसी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत दररोज लसीचे 2 लाख डोस वितरित करण्याची क्षमता आहे.

परंतु अजूनही काही भागात लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू आहे. मुंबईच्या आसपासचे शहरी लोकही येथे लस घेण्यासाठी येत असल्याने काही मुंबईकर  लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित होते. असे असूनही दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या महानगरांपेक्षा मुंबईतील लसीकरण मोहीम अधिक वेगवान आहे. सध्या स्थानिक प्रशासन दुसऱ्या डोसवर लक्ष देत आहे.

या यशाबद्दल बीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, 'आता आम्ही शहरात कोविडशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. तिसरी लाट आली तरी मुंबई त्याच्याशी टक्कर देण्यासाठी सज्ज असेल. लसीकरणाचा अर्थ असा नाही की आपण बेफिकीर राहावे. जोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला सामाजिक अंतर आणि मास्कचे नियम पाळावे लागतील.’ (हेही वाचा: Mumbai: मुंबईत सुरक्षेत वाढ, मुंबई पोलिस झाले अधिक सतर्क)

दरम्यान, या आठवड्यात 9 नोव्हेंबरला कोरोना लसीचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रमही महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून याबाबत माहिती देताना सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. भारतात, लसीकरणासाठी पात्र असलेल्या 80 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याच वेळी, 38 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.