Mumbai University (Photo Credits- Facebook)

कोविड-19 लसीकरण (Covid19 Vaccination) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालये (Colleges) सुरु होणार आहेत. यासाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) महाविद्यालयासाठी SOP's जारी केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात तीन SOP आहेत. त्यातील एक SOP महाविद्यालयीन अधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी, दुसरी महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि तिसरी कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे लक्षात घेऊन महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी कोणकोणते पाऊल उचलावे यासाठी आहे.

महाविद्यालयीन अधिकाऱ्यांना सामाजिक अंतर सुनिश्चित करणे, मास्क घालणे आणि स्वच्छता राखण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्यास सांगितले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणतेही कोरोना निर्बंध लादलेले नाहीत, अशा विभागातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी ठराविक वेळ पाळण्याचे निर्देशही महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी किंवा कर्मचारी यांनी महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहू नयेत, असे सांगण्यात आले असून केवळ लक्षणे नसलेले कर्मचारी, विद्यार्थी, यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. सर्व कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्रमाणपत्रे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचेही आदेशात नमूद आहे. (Mumbai School-College Reopen: शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी एसओपीचे पालन करणे आवश्यक- वर्षा गायकवाड)

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालय परिसरातील सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरिया, कॅन्टीन इत्यादी बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील एकूण 837 महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. राज्यातील कोविड प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. परंतु, केवळ पूर्णपणे लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात जाण्याची परवानगी आहे.

एसओपीनुसार, सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी मास्क घालाणे आवश्यक असेल. तसेच  फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप देखील इन्स्टॉल करावा लागेल. प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक बेंच रिक्त ठेवून विद्यार्थ्यांना वर्गात बसवले जाईल आणि आवश्यक असल्यास महाविद्यालय लेक्चर्ससाठी बॅच तयार करू शकते. एसओपीमध्ये असेही नमूद केले आहे की, शिक्षक आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किमान 6-8 फूट अंतर सुनिश्चित करावे. विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रमांमधील सर्व संशोधन आणि पदव्युत्तर विद्यार्थी संख्येने कमी असल्यामुळे ते कार्यक्रमात सामील होऊ शकतात.