
लोकलने प्रवास करणाऱ्या जनतेला नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एक मोठा झटका बसला आहे. नेरळ स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले असून, शीव रेल्वे स्थानकाजवळदेखील तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे संपूर्ण लोकलची वाहतूकच विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसला आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने या गोष्टीची तातडीने दखल घेतली असून, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच ही वाहतूक पुन्हा व्यवस्थित सुरु होईल असे प्रशासनाने सांगितले आहे.
बऱ्याच कामाच्या ठिकाणी 1 जानेवारीनिमित्त सुट्टी होती. यामुळे नव्या वर्षातील कामाला जाण्याचा आज पहिला दिवस होता. यातच या अचानक उद्भवलेल्या बिघाडामुळे मुंबईची लाइफलाइन ‘मुंबई लोकल’ने प्रवाशांना खोळंबून ठेवले. या गोष्टीचा परिणाम मध्ये रेल्वेवर सर्वात जास्त झाला आहे. कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरुन वळवण्यात आली आहे. त्यामुळे लोकलची वाहतूक अतिशय धीम्या गतीने होत आहे.