Auto Rickshaws | Representational Image | (Photo Credits: PTI)

ऑटो रिक्षा युनियन (Auto Rickshaw Unions) 17 मे रोजी बीकेसी येथील महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) कार्यालयाबाहेर दिवसभर आंदोलन करणार आहेत. ऑटो रिक्षा आणि टॅक्सींना अनुदानित गॅस विकण्याची त्यांची मागणी आहे. ऑटो रिक्षा युनियनचा दावा आहे की, वाढत्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किमतींमुळे त्यांना मूळ भाडे 21 रुपयांवरून ते प्रस्तावित 23 रुपये मूळ भाडे वाढवण्याची मागणी करावी लागली आहे. ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने चालकांमध्ये वाटण्यात आलेल्या पत्रकानुसार; मंगळवारी सकाळी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमजीएलच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत.

एमजीएलने ऑटो रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सींना विकल्या जाणार्‍या गॅसची विक्री किंमत कमी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे. मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, ‘ते सुमारे 500 ड्रायव्हर्स आंदोलनासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा करत आहेत. त्यांची मागणी केली आहे की एमगीएलने सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेल्या ऑटो आणि टॅक्सींना विकल्या जाणार्‍या सीएनगीची किंमत कमी करावी.’

राव पुढे म्हणाले की, ‘सीएनजी वाहने असलेल्या नियमित वाहनधारकांना ज्याप्रमाणे आयात केलेला गॅस विकला जातो, तसे आमच्यासोबत न करता एमजीएलने आम्हाला देशातच उत्पादित आणि खरेदी केलेला सीएनजी गॅस प्रदान करावा अशी आमची इच्छा आहे.‘ युनियनचा दावा आहे की त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही पत्र लिहून याबाबत कळवले आहे. (हेही वाचा: Pune: 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात Raj Thackeray यांच्या सभेचे आयोजन; MNS नेते साईनाथ बाबर यांचे परवानगीसाठी पोलिसांना पत्र)

महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती गॅसची टक्केवारी 18 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी युनियनची मागणी आहे. यामुळे आयातित गॅस पुरवठ्यावरील अवलंबित्व आपोआप कमी होईल. दरम्यान, सीएनजीच्या किमती 1 मार्च 2021 पासून 35 टक्क्यांनी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या सीएनजी 76 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.