ठाणे आणि औरंगाबाद येथील सभांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. माहितीनुसार, ही रॅली 21 मे ते 28 मे या कालावधीत एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. याबाबत मनसेने परवानगीसाठी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. आता पुण्यामध्ये होणाऱ्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याआधी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती.
राज ठाकरे यांनी सांगितले होते की, ते विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व ठिकाणी सभा घेणार आहेत. आता त्यांची पुढची सभा पुण्यात आयोजित केली आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, ‘हिंदूजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पुणे शहरात होणा-या सभेचे आयोजन मे महिन्याच्या 21 ते 28 तारखेच्या दरम्यान पुणे शहर मनसे कडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीकोना तुन तसेच सभेमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सुचने नुसार सर परशुरामभाऊ महाविदयालय चे मैदान निवडत आहोत.’ (हेही वाचा: आम्ही स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत, पण AIMIM सोबत नाही, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य)
पुढे म्हटले आहे की, ‘सदर कामी आपण योग्य त्या सुचना संबंधीत यंत्रणा व सर परशुरामभाऊ महाविदयालय प्रशासन यांना दिल्यास आम्हाला सभेचे नियोजन करण्यास सहकार्य होईल. तरी सदरबाबत योग्य ती कार्यवाही करावी.’ राज ठाकरे हे उद्या पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा राज ठाकरे आणि मनसेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ देण्यास भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे.