Air Pollution | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून थोडेफार स्वच्छ आकाश आणि सुधारलेली हवा पाहायला मिळत होती, मात्र सोमवारी सकाळी धुक्यामध्ये शहराला जाग आली. दिवाळीच्या फटाक्यांनी काल शहरातील प्रदूषणात भर घातली, ज्यामुळे आज मुंबईकरांना पुन्हा दाट धुक्याने भरलेल्या सकाळीचा सामना करावा लागला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज सकाळी शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

दुपारपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण राहील, असा अंदाजही हवामान संस्थेने वर्तवला आहे. सोमवारी तापमान 24°C ते 30°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी मुंबईचे तापमान 25.4 अंश सेल्सिअस होते तर आर्द्रता 74 टक्के होती.

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, मुंबईतील AQI सध्या 'खराब' श्रेणीत आहे, ज्याचे रीडिंग 234 आहे. संदर्भासाठी, 0 आणि 50 मधील AQI 'चांगले', 51 ते 100 'समाधानकारक', 101 ते 200 'मध्यम', 201 ते 300 'खराब', 301 ते 400 'अत्यंत खराब' आणि 401 ते 500 ‘गंभीर’ मानले जातात. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; राज्यात ढगाळ वातावरण; पुढील 24 तासात अवकाळीची शक्यता)

मुंबईतील विविध परिसरातील AQI-

कुलाबा: 173 AQI मध्यम

अंधेरी: 174 AQI मध्यम

मालाड: 309 AQI खूप खराब

BKC: 312 AQI खूप खराब

बोरिवली: 307 AQI खूप खराब

माझगाव: 267 AQI खराब

वरळी: 134 AQI मध्यम

नवी मुंबई: 184 AQI मध्यम

दरम्यान, मुंबईमधील वाढते वायू प्रदूषण पाहता हायकोर्ट आणि बीएमसीने गेल्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना फक्त दोन तास- रात्री 8-10 फटाके फोडण्याची परवानगी दिली होती. मात्र रविवार आणि सोमवारी शहरातील बहुतांश भागात या नियमाची पायमल्ली झाल्याचे दिसले. अनेक भागात दिवाळी साजरी करणाऱ्यांनी रविवारी सायंकाळपासूनच सर्व प्रकारचे फटाके फोडण्यास सुरुवात केली आणि सोमवारी पहाटेपर्यंत आतिषबाजी सुरू राहिली.