उद्या राष्ट्रवादी पक्षाची चिंतन बैठक पार पडणार, शरद पवार लावणार उपस्थिती
NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

उद्या 1 जून रोजी राष्ट्रवादी पक्षाची चिंतन बैठक सकाळी 10 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. या बैठकीला खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थिती लावणार आहेत. तर लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाचा आढावा या बैठकीदरम्या घेण्यात येणार आहे.

या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटी उपस्थिती लावणार आहे. त्याचसोबत दुपारी 2 वाजता पक्षाची जनरल बैठक सुद्धा होणार आहे. या बैठकीला पक्षातील आमदार, खासदार आणि निवडणूकीमधील उमेदवार आणि कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. तसेच बैठकीच्या वेळी आगामी विधानसभा 2019 साठी रणनिती ठरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल नवाब मलिक यांनी अधिक माहिती दिली आहे.(नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्याला शरद पवार यांची अनुपस्थिती; 'हे' आहे पडद्यामागचं कारण)

नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणूकी राष्ट्रवादी पक्षाला पाच जागांवर विजय मिळवता आला. तर काँग्रेसला फक्त एकाच जागा मिळाली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात भेटगाठ झाल्याचे दिसून आले होते. तसेच पुढील एक महिनाभर काँग्रेसच्या वतीने पत्रक काढण्यात आले असून कोणत्याही वृत्तवाहिन्यावरील चर्चेत सहभागी होणार नसल्याचे त्यामधून नमूद करण्यात आले आहे.