COVID-19 Hospital | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये रूग्ण अत्यावस्थ होण्याचं प्रमाण वाढल्यानं अनेकांना हॉस्पिटल मध्ये वेळेत गरजेनुसार बेड्स मिळण्यामध्ये गैरसोय होत होती. अशावेळेस राज्य सरकारकडून खाजगी हॉस्पिटल कडून देखील बेड्स ताब्यात घेण्यात आले होते. याकाळात कोविड उपचारांसाठी 80:20 फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. आता मुंबई भोवतीचा कोरोनाचा विळखा सैल होत असला तरीही येत्या 31 ऑगस्ट पर्यंत या 80:20 फ़ॉर्म्युलाला कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात संभाव्य तिसर्‍या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कोविड केअर सेंटर्स आणि बेड्स वाढवण्यात आले आहेत. पण खबरदारीचा उपाय म्हणून खाजगी हॉस्पिटलमधील बेड्स देखील राखून ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान काल राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून या 80:20 फॉर्म्युलाला मुदत वाढ देताना राज्यातील शहरांची 3 वर्गात वर्गवारी करून त्यांचे दर कोविड उपचारांसाठी ठरवण्यात आले आहेत. अ वर्ग शहरांमध्ये मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी , वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे. ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांचा समावेश आहे. क वर्ग भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तचे इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. दरम्यान आता बिलांचे प्री- ऑडिडेटिंग करणं देखील बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई सोबतच इतर शहरांमध्येही आता रूग्णाला बिल देण्यापूर्वी ऑडिटर कडून त्याची तपासणी करण्यात येणार आहे.

देशात कोरोना संकटाच्या काळात नॉन कोविड रूग्णांवर वेळेत उपचार होणं देखील गरजेचे आहे. अनेकदा कोविड व्यतिरिक्त इतर आजारांच्या उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होणार्‍यांच्या मनात या आजाराची भीती आहे त्यामुळे इतर आजार अंगावर काढण्याचे देखील प्रकार निदर्शनास आले आहेत पण आता खाजगी हॉस्पिटलमध्ये 20% खाटा या नॉन कोविड साठी ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या फेसबूक लाईव्ह मध्ये त्यांनी नागरिकांनी विनाकारण हॉस्पिटल बेड अडवून ठेवू नका असे देखील आवाहन केले आहे.