महाराष्ट्रात कोवीड 19 संसर्गामुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात महावितराणाला (MSEDCL) मीटर रीडिंग घेणं शक्य नाही. पहिल्या लॉकडाऊन प्रमाणे या लॉकडाऊन मध्येही मीटर रिडींग न घेतल्याने अव्वाच्या सव्वा वीज बिल येण्यापासून तुम्हांला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर महावितरणाने तुम्हांला मीटर रिडिंग (MSEDCL Meter Reading) पाठवण्याचे आवाहन केले आहे. ग्राहक मोबाईल अॅप, वेबसाईट किंवा एसएमएस द्वारा मीटर रीडिंग पाठवू शकतात. यामुळे वीज ग्राहकांचा आणि महावितरणाचा देखील त्रास कमी होणार आहे. महावितरणाच्या ग्राहकांना एसएमएस द्वारा मीटर रिडिंग पाठवण्यासाठी 4 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
ग्राहकांच्या वीजबिलांवर प्रत्येक महिन्यात 25 तारखेपर्यंत मीटरचे रीडिंग़ पाठवण्यासाठी एक तारिख नमूद केलेली असेल त्याचा मेसेज देखील ग्राहकांना महावितरणाकडून यईल या तारखेच्या 4 दिवसांपर्यंत अॅप किंवा वेबसाईट द्वारा रिडींग पाठवता येणार आहे. Mahavitaran App वर मीटरचं रिडिंग पाठवा, वीज बिलामधील गोंधळ टाळा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलांचे गोंधळ टाळण्यासाठी दिला नवा पर्याय.
SMS द्वारा कशी पाठवाल मीटर रीडिंग
MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> हा‘एसएमएस’ 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे.
SMS द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी ग्राहकांना स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी करणं आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रिडींग पाठविण्याबाबतचा मेसेज मिळेल. चूकीचा नंबर किंवा मुदतीच्या नंतर पाठवलेले एसएमएस ग्राह्य धरले जाणार नाहीत.
दरम्यान मागील लॉकडाऊन मध्ये अनेकांना तिप्पट वीज बिलं मिळाली होती. त्यामुळे अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली होती. वीजबिलं माफ करण्याची विनंती केली होती. पण सरकारने यामध्ये ईएमआय मध्ये किंवा ट्प्प्या टप्प्याने वीज बिल भरण्याचे पर्याय दिले होते. काही ठिकाणी वीज बिल न भरल्याने वीज कापणी सारखे टोकाचे पाऊल देखील महावितरणाने उचलले होते. आता पुन्हा ही परिस्थिती ओढावू नये म्हणून ग्राहकांनाच रिडिंग पाठवण्याचा आणि त्यावरून वीज बिल देण्याचा पर्याय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.