MPSC Exam 2021 Postponed: एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात वाढता कोरोना व्हायरस प्रादुर्भाव पाहता एमपीएससी परीक्षा ( MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय ( MPSC Exam 2021 Postponed) महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य मंत्रिमंडळासह विरोधी पक्षाची एक बैठक आज पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आधी ही परीक्षा नियोजीत वेळापत्रकाप्रमाणे 11 एप्रिल रोजी पार पडणार होती. मात्र, राज्यातील कोरोना व्हायरस संसर्ग पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (9 एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राज ठाकरे आदी उपस्थित होते अशी माहिती मिळते आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा येत्या रविवारी (11 एप्रिल) पार पडणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा स्वरुपाची होती. ही परीक्षा तोंडावर आली तरी परीक्षेबाबत राज्य सरकारकडून एपमपीएससीला काही सूचना मिळाली नव्हती. दुसऱ्या बाजूला राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे कठोर निर्बंध आहेत. हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. त्यामुळे निर्बंधांचे पालन करुन ही परीक्षा कशी पार पडणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, राज्याने या परीक्षाच पुढे ढकलल्या. (हेही वाचा, RTE Maharashtra Lottery Result 2021: 1ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 25% राखीव जागांची सोडत जाहीर; 15 एप्रिल पासून मिळणार SMS द्वारा प्रवेशाची सूचना)

राज्यातील वाढता कोरोना व्हायरस प्रादुर्भाव पाहता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी होत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या चर्चेदरम्यान परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अश्वासन दिले होते.

 

दरम्यान, गेल्याच महिन्यात एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगितले होते. या वेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक पाहायला मिळाला होता. विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलन केले होते. या आंदोलनास भरतीय जतना पक्षाच्या नेत्यांनीही सहभाग घेतला होता. त्यानंतर एमपीएससीने पुढची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार येत्या 11 एप्रिलला परीक्षा होणार होत्या. परंतू, आता पुन्हा एकदा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.