RTE Admission 2021-22: यंदा RTE कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या प्रवेशाची लॉटरी ऑनलाईन पद्धतीने काढण्याची प्रक्रिया काल (7 एप्रिल) पूर्ण करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन त्याची माहिती देताना येत्या 15 एप्रिल नंतर पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रवेशाबाबतचे मेसेज पाठवले जातील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या आरटीई प्रवेशाच्या ऑनलाईन सोडती दरम्यान शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी दत्तात्रय जगताप, दिनकर टेमकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आटीई कायद्यानुसार वंचित घटकांसाठी खाजगी शाळांमध्ये 25% प्रवेश आरक्षित असतात. या कोट्यातून अॅडमिशन मिळालेल्यांना मोफत शिक्षण दिले जाते.
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. तर खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
RTE अंतर्गत २५% राखीव जागांची लॉटरी आज ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. १५ एप्रिल २०२१ नंतर पालकांना प्रवेश प्रक्रियेचे SMS प्राप्त होण्यास सुरुवात होईल. याप्रसंगी श्री. दत्तात्रय जगताप, श्री. दिनकर टेमकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha pic.twitter.com/UQNDselCsr
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 7, 2021
मुंबईत आरटीई साठी 352 शाळांमध्ये 6463 जागा राखीव आहेत. त्यामध्ये 292 सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत. 62 शाळा राज्य सराकारच्या शिक्षण बोर्डाशी जोडलेल्या आहेत. राज्यांत 96801 एकूण जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.
दरम्यान 15 एप्रिल नंतर ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार आहे त्यांना रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, सादर करावा लागणार आहे. दरम्यान आरटीई अंतर्गत अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शाळेत प्रवेश दिले जातात.