दिल्लीमध्ये सोमवार (18 नोव्हेंबर) पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये दुसर्याच दिवशी म्हणजे काल महाराष्ट्रातील शिरूर मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुन्हा राज्यात बैलगाडा शर्यत (Bullock Cart Racing) सुरू करण्याची मागणी केली आहे. लोकसभेच्या शुन्य प्रहरातील चर्चेमध्ये प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील भेट घेतली. यावेळेस बैलगाडा शर्यत ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्याला पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. यावर प्रकाश जावडेकर यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया देऊन पुन्हा भेटीचं आश्वासन दिल्याचे म्हटले आहे.अमोल कोल्हे यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.
अमोल कोल्हे याचे ट्वीट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरू झाल्या पाहिजेत. pic.twitter.com/9t9D0Ef1HJ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 20, 2019
अमोल कोल्हे शिरूरचे खासदार आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरुर या भागामध्ये बैलगाडा शर्यत लोकप्रिय आहे. देशी गाईंचा वंश टिकवण्यासाठी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करणं आवश्यक आहे. या शर्यतींवर ग्रामीण शेतकर्यांचं अर्थकारणही अवलंबून आहे असे सांगितले आहे. बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 2014 च्या मध्यात राज्यात बैलगाडा शर्यतींवर शर्यती दरम्यान बैलांवर होणारा अत्याचार पाहता बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. बैलगाडा शर्यत बंदीला शेतकरी आणि आयोजकांचा विरोध आहे.
जलिकट्टू प्रमाणे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणार?
दरम्यान 2018 साली तामिळनाडूमध्ये जलिकट्टू या दक्षिणेतील पारंपारिक खेळ पुन्हा सुरू केला. त्याचाप्रमाणे आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. 'पेटा इंडिया' या संस्थेने बैलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावेळेस बैलांना क्रुरपणे वागवण्यात येत असल्याचे सांगत या खेळावर बंदी घातली होती. 2011 साली सर्वोच्च न्यायालयाने वाघ, माकड सारख्या इतर प्राण्यांच्या खेलाच्या प्रदर्शनावरही बंदी घातली.