'करारा जबाब' मिलेगा म्हणत मनसे(MNS) कडून ठाण्यात आज राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उत्तर सभेची तयारी करण्यात आली आहे. गुढी पाडव्याला झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा असा आदेश दिल्यानंतर राज्यात तेढप्रसंग निर्माण झाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातही टीकेचे बाण सोडण्यात आले. या सार्यांवर आज राज ठाकरे उत्तर देणार आहेत. हे देखील नक्की वाचा: MNS Thane Rally: करारा जवाब मिलेगा म्हणत मनसे कडून ठाण्यात होणार्या 'उत्तरसभे'चा टीझर जारी .
ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील डॉ. मूस रोडवर आज संध्याकाळी राज ठाकरेंची सभा होणार आहे. दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांनी केलेलं ट्वीट चर्चेमध्ये आहे. मागील विधानसभा निवडणूकीमध्ये राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडीओ' अनेकांची पोलखोल करणारा ठरल्यानंतर आता आजच्या सभेत राज ठाकरे अजून कोणता राजकीय धमाका करणार? याची उत्सुकता मनसैनिकांना लागली आहे.
वसंत मोरे- राज ठाकरेंची भेट, राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या वाढत्या गाठीभेटी आणि महाविकास आघाडी यांच्यावरून आजच्या भाषणात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.
संदीप देशपांडे ट्वीट
राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना "लावरे तो व्हिडीओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 12, 2022
उत्तरसभा म्हणजे हिशेबाचा दिवस
आज राजसाहेब करारा जवाब देणार
आज ठाण्यात राजगर्जना घुमणार
आणि भ्रष्टवादी महाखिचडीची तंतरणार
चलो ठाणे
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 12, 2022
दरम्यान राज ठाकरेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसैनिकांकडून मोठी तयारी केली जात आहे. बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरेंची ही उत्तरसभा 9 एप्रिल दिवशी होणार होती पण पोलिस परवानगीमुळे त्याच्या तारखेत बदल करून ती 12 एप्रिल करण्यात आली आहे.