मनसेच्या जागर यात्रेला (MNS Jagar Yatra) आज पहाटेपासून सुरूवात झाली आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखाली या जागर यात्रेला सुरूवात झाली आहे. पळस्पे पासून त्यांनी पदयात्रा सुरू केली आहे. मागील 17 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, निकृष्ट दर्जाचे झालेलं काम याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने ही जागर यात्रा सुरू केली आहे. मनसेचे 8 विविध नेते वेगवेगळ्या टप्प्यावर चालणार आहेत.तर या पदयात्रेचा समारोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
एकूण 16 किमीच्या या पदयात्रेमध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे या यात्रेमध्ये विविध टप्प्यात चालणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर विविध अपघातांमध्ये आतापर्यंत अडीज हजारांपेक्षा अधिक लोकांनी जीव गमावला आहे.
कोकण जागर यात्रेतील ही सुरुवातीचं काही क्षणचित्रं. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवास किती खाचखळग्यातून करावा लागतो ते दाखवणारी काही क्षणचित्रं आणि ह्या यात्रेला मिळत असणारा प्रचंड पण उस्फुर्त प्रतिसाद . #कोकणजागरयात्रा pic.twitter.com/71fN8wFCwx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 27, 2023
या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. Mumbai- Goa Highway: गणेशोत्सव होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी .
दरम्यान काल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कामाची पाहणी केली आहे. हे काम लवकरच होणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या महामार्गावरील एका लेनचं काम गणेशोत्सवापूर्वी होणार आहे. तर दुसऱ्या लेनच काम डिसेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.