तब्बल 3 वर्षांनंतर मनसेच्या पाडवा मेळावामध्ये अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) तोफ डागल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून टीका-टीपण्णी सुरू झाली आहे. मनसेला आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) भाजपाची टीम सी (BJP Team C) संबोधल्यानंतर मनसेकडूनही (MNS) प्रतिवार आला आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मनसे आता शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची 'ढ' टीम आहे. असा टोला लगावला आहे. आज मुंबईमध्ये मीडीयाला प्रतिक्रिया देताना, 'मुंबई महानगरपालिकेत वीरप्पन गँग अॅक्टिव्ह आहे. ईडी या सगळ्याविरोधात सक्रिय झाल्यानंतर त्याचा हिशेब कसा द्यायचा, याचा विचार आदित्य ठाकरे यांनी करावा असेही ते म्हणाले आहेत.
गजानन काळे ट्वीट
शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची 'ढ' टीम 😂
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 3, 2022
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रात्री उशिरा 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट देखील घेतली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना ही भेट वैयक्तिक होती असं जरी म्हटलं असलं तरीही मागील काही दिवसांत भाजपा नेत्यांची मनसे अध्यक्षांच्या घरी वाढलेली ये-जा पाहून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. दरम्यान यावरही संदीप देशपांडे यांनी वक्तव्य करत 'शिवसेना,राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं.' असं ट्वीट केले आहे.
संदीप देशपांडे ट्वीट
एक तर गोष्ट स्पष्ट आहे की भाजप मनसे युती चा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही भविष्यात काय होईल माहीत नाही पण मनात प्रश्न येतो शिवसेना,राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 4, 2022
मनसे अध्यक्षांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाईल असं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी हनुमान चालिसा लावण्यात आल्या आहेत.