राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे | (Photo Credits- Facebook )

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. सरदार पटेल यांच्या स्मारकावर तब्बल २, २९० कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला. त्यावरुनच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत 'हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल?', असा सवाल ठाकरे यांनी विचारला आहे. ठाकरे यांनी हा सवाल आपल्या खास शैलीत रेखाटलेल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून विचारला आहे.

दरम्यान, राज यांनी व्यंगचित्रात स्मारकाच्या रुपात उभे असलेले सरदार पटेल दाखवले आहेत. मात्र, पटेलांच्या चेहऱ्यावरील भाव असे काही रेखाटले आहेत की, त्यावरुन स्मारकाला करण्यात आलेला खर्च पटेलांना अजिबात आवडला नसल्याचे दिसते. दरम्यान, 'अरे तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभारण्यापेक्षा आहेत ती माणसे जगवा ना!', असे हताश उद्गार पटेलांच्या तोंडी दाखवायलाही राज ठाकरे विसरले नाहीत. (हेही वाचा, मोदी,शाहांच्या चरख्यासाठी हिंदुस्तानच्या जनतेचे 'वस्त्रहरण'; राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून टीका).

व्यंगचित्रातील आणखी एक लक्षवेधी खोच अशी की, पटेलांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी आलेल्या व्यक्तिमत्वांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी प्रचंड साधर्म्य दाखवणाऱ्या व्यक्तिरेखा राज यांनी व्यंगचित्रात रेखाटल्या आहेत. या व्यक्तिरेखांची देहबोली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत.