गांधी जयंती: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र ( (Photo Credits: twitter.com/RajThackeray)

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचे कट्टर समर्थक. पण, नोटबंदीनंतर देशाला मिळालेल्या चलनचटक्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेपासून यूटर्न घेतला. त्यामुळे गेल्या काही काळापासून राज ठाकरे आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर चांगलेच फटकारे ओढत आहेत. आजही (2 ऑक्टोबर) गांधी जयंतीचे औचित्य साधत राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे मोदींवर निशाणा साधला. व्यंगचित्रामध्ये ठाकरे यांच्या कुंचल्याचे काही फटके भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही पडले आहेत

राज ठाकरे यांनी आज रेखाटलेल्या व्यंगचित्रात महात्मा गांधी, त्यांचा चरका आणि त्यावर सूत कातायला बसलेले प्रतिकात्मक मोदी. सोबतीला भाजपाध्यक्ष अमित शाह आणि भाजप सरकारच्या धोरणांचे इतस्त: पडलेले कागद दिसत आहेत. एका कोपऱ्यात अंधार दिसतो आहे. ज्यात मोदी सरकारच्या धोरणांमधला संभ्रम रेखाटला आहे. या चित्रात देशातील जनतेची झालेली दयनिय आवस्था आणि त्यांचे शोषण करणारी व्यवस्थाही ठाकरे यांनी मोठ्या रंजक आणि तितक्याच व्यंगात्मक पद्धतीने दिसत आहे.

चित्राबाबत सांगायचे तर, बापूंच्या (महात्मा गांधी) आश्रमाबाहेरील ओट्यावरचे हे कल्पनाचित्र असावे असे जाणवते. चरख्यावर सूत कातण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले आहेत. मागे गोंधळलेल्या आवस्थेत अमित शाह आहेत. दरम्यान, मोदींनी सूत कातायला सुरुवात केली आहे. पण, हे सूत कातण्यासाठी मोदी लोकर नव्हे तर, भारतीय जनतेच्या कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. म्हणजेच, मोदी-शाहांचा चरखा चालण्यासाठी जनतेचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न सरकारद्वारे चाललेला आहे, असा अप्रत्यक्ष संदेश व्यंगचित्रातून चित्रकाराला द्यायचा असावा असे, प्रथमदर्शनी जाणवते. ‘कापडापासून सूत’ असा या व्यंगचित्राचा मथळा असून मोदी सरकारच्या काळात देशात आर्थिक आणि वैचारिक गोंधळ दिसून येतो, अशी टीका या व्यंगचित्रातून करण्यात आली आहे. महात्मा गांधी सूत कातून कपडे तयार करायचे मात्र, मोदी सरकार चक्क जनतेचेच वस्त्रहरण करून सूत काढत असल्याचे व्यंगचित्रात दाखवले आहे.

दरम्यान, महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती आहे. देश आणि जगभरातून महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्र कलेच्या माध्यमातून गांधींना अभिवादन केले आहे. पण, तिरकसपणा हा व्यंगचित्रकाराचा मूळ स्वभाव असतो असे म्हणतात. त्यानूसार ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याचे फटकारेही ओढलेले दिसतात.