MNS Vs NCP: जातीच्या राजकारणांवरून मनसे आणि राष्ट्रवादी आमने-सामने; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, नवाब मलिक यांचे उत्तर
Raj Thackeray, nawab malik (Photo credit: PTI)

आगामी महापालिका निवडणुकांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील या निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे समोर येण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जबाबदार धरले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा त्यांनी दावा केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, त्यांनी राज ठाकरे यांना वाचन वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे की, “राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू– फुले– आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष आहे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचे काम केले. या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली. ज्यामुळे जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र, यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला, हे देखील राज ठाकरे यांना माहिती नसावे. त्यांनी अज्ञातून हे वक्तव्य केले असावे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. हे देखील वाचा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

राज ठाकरे यांनी काय म्हटले?

राज ठाकरे यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखात दिली होती. त्यावेळी त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू झाले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मनसे- राष्ट्रवादी पक्षात आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी दिलेल्या उत्तरावर मनसेकडून आता नेमकी कोणती प्रतिक्रिया देते? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.