MHADA Lottery Website Scam | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Fake MHADA Website Scam: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट (MHADA Fake Website) तयार केल्याबद्दल सायबर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. कल्पेश आणि अमोल पटेल अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे या बनावट संकेतस्थळाद्वारे म्हाडा (गृहनिर्माण) लॉटरी (MHADA Lottery) योजनेच्या अर्जदारांची फसवणूक करत असत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे की, आरोपी कल्पेश सेवक याने बनावट पोर्टल तयार केले, तर त्याचा साथीदार अमोल पटेल याने पीडितांना आमिष दाखवण्यासाठी म्हाडा अधिकारी असल्याचे भासवून त्यांची फसवणूक केली.

अनेक लोक या तोतयांच्या कच्छपी

म्हाडाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सदर संस्थेची अधिकृत वेबसाईट ‘mhada.gov.in’ आहे. मात्र, फसवणूक करणाऱ्यांनी या संकेतस्थळाशी साधर्म्य असणारी ‘mhada.org’ या डोमेन अंतर्गत तोतया वेबसाईट सुरु केली. धक्कादायक म्हणजे गुन्हेगारांनी अधिकृत साइटचे लेआउट, होमपेज आणि पत्त्याची नक्कल करून अनेक लोकांना फसवण्यात यश मिळवले. आरोपींनी अर्जदारांना सांगितले की, त्यांना अर्ज प्रक्रियेची आवश्यकता नाही. त्या ऐवजी त्यांनी थेट पेमेंट पर्याय उपलब्ध करुन दिला. तसेच, हे पैसे घेऊन वापरकर्त्यांनी (अर्जदारांनी) आपले फ्लॅट सुरक्षीत केले आहेत, असे भासवले गेले. त्यामुळे अनेक लोक या तोतयांच्या कच्छपी लागले आणि फसवले गेले. (हेही वाचा, MHADA Lottery 2024: म्हाडा घरांसाठी अर्ज, लॉटरी पाहण्यासाठी अधिकृत पोर्टलच वापरा; Fake Website Scams नंतर अधिकृत इशारा)

फ्लॅटची किंमत 30 लाख रुपये

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका अर्जदाराला (पीडित) चक्क गोरेगाव येथील एका म्हाडा अपार्टमेंटमध्ये नेले. धक्कादायक म्हणजे त्यांनी फ्लॅटची किंमत 30 लाख रुपये इतकी असल्याचे पीडिताला सांगितले. शिवाय फ्लॅटची मालकी मिळवायची असेल तर सदर वेबसाइटद्वारे (बनावट ) रक्कम ऑनलाइन भरण्याची अवश्यकता असल्याचे सांगितले. अनेकांकडून ही रक्कम भरुनही घेण्यात आली. आतापर्यंत किमान चार जण या घोटाळ्याला बळी पडले असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. (हेही वाचा, Mhada Fake Website: सावधान! सायबर ठगांनी बनवली हुबेहुब म्हाडासारखीच वेबसाईट)

एका सायबर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, म्हाडाने बनावट साइटबद्दल तक्रार नोंदवल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली, जी मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये नव्याने रिलीज झालेल्या 2,030 फ्लॅटच्या अर्जदारांना फसवण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलीस आणि म्हाडाने लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. खास करुन गृहनिर्माण योजनांशी संबंधित कोणतीही देयके देण्यापूर्वी वेबसाइट्सची सत्यता पडताळून पाहा, असे अवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा, Mumbai Mhada House: म्हाडाची घरे परवडणार का? किमंत ऐकून मुंबईकरांना फुटला घाम)

म्हाडाचा अधिकृत इशारा

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांनी या घटनेनंतर जाहीर इशारा दिला आहे की, अर्जदारांनी अर्ज सादर करताना केवळ अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वपर करावा. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. म्हाडाने यावर भर दिला की फ्लॅट्सचे वाटप केवळ सुरक्षित, संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे, मानवी हस्तक्षेपाशिवाय केले जाते.