Mhada | (Archived, edited, representative images)

MHADA Lottery Mumbai: मायानगरी मुंबईमध्ये स्वत:च्या हक्काचे घर म्हणजे जणू त्या व्यक्तिच्या यशस्वी जीवनाची पोचवापतीच. त्यामुळे मुंबईतील असंख्य लोक या महाकाय शहरात स्वत:च्या हक्काचे छप्पर मिळविण्यासाठी दिवसरात्र ढोरमेहनत करतात. परंतु, मुंबईतील घरांच्या किमती आणि वार्षिक उत्पन्न यांचा मेळ न बसल्याने अनेकांचे स्वत:च्या मालकिचे घर हे स्वप्न स्वप्नच राहते. अशा वेळी कामी येते म्हाडा ( MHADA ) प्राधिकरण. बाजारातील घरांच्या किमतींच्या तुलनेत कितीतरी पटीने स्वस्त किमतीत म्हाडा घरे (MHADA House) देऊ करते. त्यामुळे जवळपास सर्वांचाच डोळा म्हाडांच्या घरांवर असतो. अशा या म्हाडाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 83 अर्ज भरले. हा व्यक्ती सरकारी अधिकारी असून, त्याने स्वत: आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावेही अर्ज भरले. अखेर इतका सगळा खटाटोप पूर्ण केल्याव त्याला अखेर म्हाडाच्या सोडतीत घर लाभले. पंतनगर येथील म्हाडा प्रकल्पात तो एका घराचा मालक झाला. त्याच्या गृहपूर्तीची कथा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

प्राप्त माहिती अशी की, मुंबईत म्हाडांच्या घराची नुकतीच सोडत झाली. या सोडतीसाठी एकूण १,३८४ घरे होती. त्यासाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी सुमारे १ लाख ६५ हजार अर्ज वैध ठरले. या सोडतीसाठी नेहमीप्रमाणेच अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट अशी वर्गवारी होती. आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार अर्जदारांनी घरांसाठी अर्ज केले होते. म्हाडाच्या घरांच्या संख्येच्या तुलनेत येणाऱ्या अर्जाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सोडतीवेळी प्रचंड स्पर्धा असते. सोडतीत घर लाभावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेले असतात. त्यामुळेच एका अर्जदाराने म्हाडाच्या घरासाठी तब्बल 83 अर्ज भरले. एकाच सदस्याने इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्याची गेल्या काही काळातील बहुदा ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या अर्जदारांच्या नावे अर्ज भरताना या अर्जदाराला तब्बल 75 हजार रुपयांचा भरणा करावा लागला. ही रक्कम अनामत स्वरुपाची असल्याने घर न लागल्यास ती परत मिळते. पण, इतक्या मोठ्या प्रमाणावर भरणा करने सर्वसामान्य नागरिकांना कठीण असते. त्यामुळे अनेक जण केवळ एका गटात अर्ज करण्यास प्राधान्य देतात. (हेही वाचा, MHADA घरविजेत्यांसाठी खुशखबर; म्हाडाच्या घरांच्या किंमती 5% कमी)

८३ अर्जांसोबत ६२ लाख २५ हजारांवरील रक्कम जमा

म्हाडाचे घर या एकाच ध्येयाने पछाडलेल्या या अर्जदाराने कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे अर्ज दाखल केले. वेगवेगळ्या भागातील उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज भरल्याने अर्जांची संख्या ८३ वर पोहोचली. या अर्जांसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी या अर्जदाराने देशभरात विविध ठिकाणी असलेली मालमत्ताही विकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या विक्रितून आलेल्या रकमेतून त्याने 83 अर्ज आणि त्यासोबत 62 लाख 25 हजार रुपयांचा भरणा केला. आता इतकी मोठी रक्कम भरल्यानंतर तरी त्याचे नशीब फळफळणार का? अन त्याला म्हाडाचे घर लागणार का याबाबत उत्सुकता होती. मात्र, अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. त्याला म्हाडाचे घर लाभले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव प्रसारमाध्यमांनी या अर्जदाराचे नाव जाहीर केले नाही.