म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाकडून (MHADA Konkan Board Lottery 2023) आज घराच्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 5309 घरांचा समावेश आहे. ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यासही आजपासून सुरूवात झाली आहे. याकरिता तुम्हांला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट housing.mhada.gov.in ला भेट द्यावी लागेल. या घरांसाठी 7 नोव्हेंबर दिवशी सोडत जारी केली जाणार आहे.
मे 2023 मध्येही कोकण विभागात घरांची सोडत जाहीर झाली होती परंतू त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. अनेक घरं यामध्ये विकली गेलेली नाहीत. ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग भागातील घरं या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. आज 15 सप्टेंबरच्या सकाळी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी आयोजित कार्यक्रमात अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये 1010 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.
कोकण विभागातील घरांसाठीचा लकी ड्रॉ हा 7 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई मधील वांद्रे पूर्व च्या म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात काढली जाणार आहे.
नोंदणी करणं, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा आता ऑनलाईन सुलभ करण्यात आल्या आहेत. त्यासाठी म्हाडाने IHLMS 2.0 ही संगणकीय प्रणाली अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध करून दिली आहे. Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल ॲप उपलब्ध आहे. त्याच्या मदतीनेही अर्ज करता येणार आहे.
16 ऑक्टोबर, 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना कोकण विभागातील घरांसाठी अर्ज करता येतील. अनामत रक्कम भरण्यासाठी 18 ऑक्टोबर पर्यंत वेळ आहे. तर अंतिम यादी 3 नोव्हेंबरला जारी केली जाईल.
अर्जदारांना सोडतीचा निकाल मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे तसेच ॲपवर कळवला जातो. तसेच, त्याच दिवशी संध्याकाळपासून भाग्यवान अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.