Measles Outbreak in Maharashtra: मुंबईपाठोपाठ राज्यात नाशिक, नागपूर अकोला येथेही गोवरचा प्रादुर्भाव, संसर्गाचा वेग कोरोनापेक्षाही अधिक
Measles | Representational image (photo credit- Wikimedia commons)

Measles Outbreak in Maharashtra: गोवर (Measles) आजाराचा प्रादुर्भाव केवळ मुंबई शहरापुरताच (Measles in Mumbai) मर्यादित नाही. त्याचा प्रादुर्भाव आता मुंबईबाहेर राज्यभरात अनेक ठिकाणी जाणवू लागला आहे. प्राप्त माहितीनुसार नवजात बालकापासून ते पाच वर्षे वयाच्या बालकांपर्यंत हा अजार अधिक त्रासदायक ठरतो आहे. गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) आणि राज्याचा आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करत आहेत. सध्या तरी लहान बालकांमध्ये आढळणारा गोवर आजार अपवादात्मक स्थितीमध्ये वयवर्षे 18 पेक्षाही अधिक असलेल्या व्यक्तीस होताना दिसतो आहे. राज्यात मुंबई पाठोपाठ नाशिक, नागपूर अकोला जिल्ह्यातही गोवर सक्रमित रुग्ण आढळले आहेत.

गोवरची लस दिल्यास या आजारापासून बचाव होण्याचे प्रमाण 99% नी वाढते. त्यामुळे कोरोनाच्या तुलनेत गोवरच्या आव्हानाचे प्रमाण बरेच कमी आहे. जानेवारी 2022 पासून महाराष्ट्रात नोंद झालेल्या गोवरच्या रुग्णांची संख्या 717 वर पोहोचली आहे, ज्यात मुंबईतील 303 रुग्णांचा समावेश आहे, असे असे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. (हेही वाचा, Measles Outbreak In Mumbai: गोवर आजाराचा संसर्ग कसा थांबवाल? मुलांना व्हायरल संसर्गापासून रोखण्यासाठी 6 महत्त्वाचे उपाय, घ्या जाणून)

गोवर या विषाणूजन्य आजाराच्या संसर्गाचा परिणाम प्रामुख्याने लहान मुलांवर होतो. आतापर्यंत गोवर आजाराचा संसर्ग होऊन 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या एकट्या मुंबईमध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत गोवरमुळे 10 मृत्यू झाल्याची नोंद असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मंगळवारी मुंबईत गोवरचे पाच नवीन रुग्ण आढळले आणि एकाचा संशयास्पद मृत्यू झाला, असे पालिकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, जानेवारी 2022 पासूनची आकडेवारी पाहिली तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात 70 तर मुंबईजवळील भिवंडीत 48 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2022 पासून मुंबईत 11,390 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात 2019 मध्ये 1,337, 2020 मध्ये 2,150 आणि गेल्या वर्षी 3,668 पुष्टी झालेल्या रुग्णांची नोंद झाली. या वर्षी गोवरामुळे मृत्यू झालेल्या 14 रुग्णांपैकी फक्त एकानेच लस घेतली होती, असेही महापालिकेने म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मृत्यू झालेल्या रूग्णांपैकी 0-11 महिने वयोगटातील चार अर्भक होते, आठ 12-24 महिने वयोगटातील दोन आणि प्रौढ 25-60 वयोगटातील होते. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईत 10, भिवंडीत तीन आणि वसई-विरार भागात एक मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे.