
मुंबई (Mumbai) पाठोपाठ राज्यात इतर जिल्ह्यांमध्येही गोवरचे रूग्ण वाढत आहेत. गोवरच्या (Measles) विळख्यात काही चिमुकल्या बालकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे या संसर्गजन्य आजाराचा वाढता धोका पाहता सरकारकडून 11 सदस्यीय टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. सुभाष साळुंखे (Dr. Subhash Salunkhe) या टास्क फोर्सचे अध्यक्ष असणार आहेत.
आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असणार आहेत. या टास्क फोर्सच्या टीममध्ये संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचा देखील समावेश असणार आहे. टास्क फोर्सच्या स्थापनेनंतर त्यांच्या बैठका होतील आणि वाढती रुग्णसंख्य नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. गोवरचे सर्वाधिक रूग्ण मुंबई शहरामध्ये आहेत. नक्की वाचा: Measles Outbreak In Mumbai: गोवर आजाराचा संसर्ग कसा थांबवाल? मुलांना व्हायरल संसर्गापासून रोखण्यासाठी 6 महत्त्वाचे उपाय, घ्या जाणून .
राज्यात गोवर संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. पहिला मृत्यू 22 नोव्हेंबर रोजी शिल येथील साडे सहा वर्षांच्या मुलीचा आणि दुसरा मृत्यू 27 नोव्हेंबर रोजी कौसा येथील दीड वर्षाच्या मुलाचा झाला. 12 महिने ते 24 महिने वयोगटातील मुलांमध्ये सर्वाधिक (10) मृत्यू आहेत.
डॉ. साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवरमुळे यापुढे बालकांचा मृत्यू होऊ नये यासाठी टास्क फोर्स काम करणार आहेत. “ही आरोग्य प्रणालीची समस्या आहे ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि बालरोगतज्ञांनी निवडून आलेल्या नेत्यांसह एकत्र काम करावे लागेल.” असे ते म्हणाले. ते म्हणाले की पुढील महिना महत्त्वपूर्ण असेल ज्यामध्ये युद्धपातळीवर एकत्र करावे लागेल.