मुंबईत मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर्स उभारण्याचं काम सुरु; जीव वाचवणं हेच प्राधान्य- महापौर किशोरी पेडणेकर
Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

मुंबईत (Mumbai) कोविड सेंटर्स (Covid Centers) उभारण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरु झालं असून कांजूरमार्ग, मालाड येथे रहेजा मैदानावर 2000 बेड्स पैकी 200 आयसीयू बेड्स असतील. सोमय्या ग्राऊंडवर 1000 पैकी 200 आयसीयू बेड्स असतील. महालक्ष्मी येथे 5300 बेड्स आणि 800 आयसीयू बेड्स तयार करण्यात येतील. येत्या 2-3 दिवसांत मुंबईकरांसाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल, असं सांगत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) नागरिकांना आश्वस्त केलं आहे. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कोरोना व्हायरस संकटाची तीव्रता प्रत्येकाच्या लक्षात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या विचाराला व्यापारी आणि विरोधकांकडून सहमती मिळताना दिसत आहे. सध्याची रुग्णवाढ पाहता जीव वाचवणं हेच प्राधान्य असायला हवं, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काल व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, इतर मंत्री आणि विरोधकांचे आघाडीचे नेते उपस्थित होते. त्यामुळे सर्वांच्या सूचनांचा गांर्भीयाने विचार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

रेल्वेचे 2 हजार 800 बेड ताब्यात घेण्यासाठी देखील मुंबई पालिकाचे प्रयत्न सुरु आहेत. वरळीत दोन ते अडीच हजार बेड्स तयार करण्यात येतील. तसंच कांजूरमार्ग येथेही बेड्स उपलब्ध होणार आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांनी त्यांच्या वार्डमध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे बेड उपलब्ध होताच रुग्णाला तो देण्यात येईल. तसंच मोठ्या प्रमाणावर लक्षणं दिसल्यास तात्काळ पालिकेच्या सेंटरमध्ये या. खाजगी रुग्णालयांसाठी थांबून विलंब करु नका. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे सध्याच्या काळात आवडीच्या रुग्णालयाचा आग्रह धरु नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. सध्याच्या परिस्थिती राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे जितकं काम करता येईल तेवढं करायला हवं, असंही त्या म्हणाल्या. (आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हल्ली कुणीही उठतयं आणि काहीही करतय- महापौर किशोरी पेडणेकर)

ताटात लोणचं लावल्याप्रमाणे राज्याला लस देऊ नका. भूतान, पाकिस्तानला लस देण्याआधी देशातील प्रत्येक नागरिकांचा त्यावर अधिकार आहे, असं पेडणेकर म्हणाल्या. तसंच राज्यात सुनियोजन करुनच लसीकरण केलं जात असून लस वाया जाण्याचं प्रमाण कमी असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्त्युतर दिले आहे.

लॉकडाऊन मजूर, गरीब यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी पालिकेने तयारी सुरु केली आहे. तसंच या काळात सढळ हस्ते मदत करण्यासाठी एनजीओ, सेवाभावी संस्थांनी पुढं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.