महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा पडल्याने राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहिम थांबविण्यात आली आहे. लसीचा पुरवठा करण्याचे काम सुरु आहे. मात्र विरोधक यावर राजकारण करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे अशी टिका मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मुंबईत विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) व्यवस्थित सुरु आहे का याची पाहणी करण्यासाठी गेले असता लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावर त्यांनी भाष्य केले.
"मुंबईत गळे काढणारे आता सांगतायत की लस उपलब्धतेवरून खोटे दावे केले जात आहेत. पण हॉस्पिटलमध्येच लसीचा शून्य साठा, एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचा साठा असं दाखवत आहेत. ते कसं खोटं होऊ शकतं? इतर राज्यांच्या तुलनेत लस वाया जाण्याचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. इतर राज्यांमध्ये ६ टक्के, ७ टक्के आहे. त्यामुळे मुंबईकरांना हात जोडून विनंती की या गळे काढणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या", असं महापौर किशोरी पेडणेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.हेदेखील वाचा- Lokmanya Tilak Terminus: कडक लॉकडाऊनच्या भीतीतून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी
"मुंबईकरांची जेवढी काळजी घेता येईल, तेवढी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यामुळे कुठेही प्रशासन म्हणून आम्ही हलगर्जीपणा करत नाही आहोत. लोकांनी साथ देणं गरजेचं आहे." असंही ते यावेळी म्हणाल्या.
ऑफिसमध्ये बसून टीका करणं सोपं आहे. आमच्यासोबत कोविड वॉर्डमध्ये, आयसीयूमध्ये जाऊन बघायला हवं. आघाडी सरकारला बदनाम करायचं, उद्धवजींच्या कामावर बोट ठेवायचं. हल्ली कुणीही उठतंय आणि काहीही करतंय. ज्याचा काडीचाही संबंध नाही अशी लोकं बोलायला लागली आहेत”, असा टोला यावेळी किशोरी पेडणेकर यांनी लगावला. “पानावर बसल्यावर लोणचं वाढतात, तशा आपल्याला लसी देत असतील, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, असं देखील त्या म्हणाल्या.
तसेच नागरिकांनी सरकारने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करा आणि प्रशासनाला मदत करा. असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.