Divorce | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर (Nagpur) खंडपीठाने अकोला (Akola) येथील एका पीडित पतीचा घटस्फोट (Divorce) कायम ठेवत त्याला दिलासा दिला आहे. या प्रकरणातील तरुणाचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ज्या तरुणीसोबत याचा विवाह झाला तिला विवाहापूर्वीच असाध्य आजार होता. या आजाराची कोणतीही कल्पना सदर तरुणी अथवा तिच्या कुटुंबीयांनी तरुण किंवा त्याच्या कुटुंबीयांना दिली नाही. ही एक प्रकारची फसवणूक असल्याचे सांगत कोर्टाने पतीचा घटस्फोट कायम ठेवला. न्यायमूर्ती विनय जोशी आणि महेंद्र चांदवाणी यांनी निकाल देताना म्हटले की, कोणताही विवाहयोग्य तरुण अथवा तरुणीस असाध्य आजार असेल आणि तरीही ते विवाह करु इच्छित असतील तर, अशा वेळी त्यांनी समोरील पक्षास याबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. आपल्या असाध्य आजाराची माहिती दडपून किंवा लपवून विवाह करणे ही फसवणूक आहे.

तरुणी असाध्य आजाराने त्रस्त

महिला आणि तिच्या पालकांना विवाहापूर्वीच तिच्या आजाराबाबत माहिती होती. सदर तरुणी विवाहापूर्वी Nocturnal lagophthalmos ने त्रस्त होती. असे असताना त्याबाबत तिच्या होणाऱ्या पतीस म्हणजेच तरुणास सदर आजाराबाबतची माहिती देणे आवश्यक होते. ती माहिती दिली असती तर त्या तरुणाने विवाह करण्याबाबत होकार किंवा नकार दिला असता. त्याबातब त्याला निर्णय घेता आला असता. मात्र, या बाबतीत त्याची फसवणूक झाली, असे खंडपीठाने पत्नीची वैवाहिक हक्कांची परतफेड करण्याची याचिका फेटाळताना आणि घटस्फोट कायम ठेवताना म्हटले. (हेही वाचा, Sex Marriage Promise: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, हायकर्टाने फेटाळला विवाहीत पुरुषाचा जामीन अर्ज)

'बाब अदखलपात्र असली तरी फसवणूक झाली हे महत्त्वाचे'

महिलेच्या डोळ्याच्या पापणीमध्ये हा काहीशी समस्या आहे. तसे पाहता ही बाब अदखलपात्र आहे. त्यामुळे लैंगिक संबंध अथवा वैवाहीक सुख यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. हे मान्य आहे. मात्र, असे असले तरी त्याबाबत कोणतीही माहिती समोरील पक्षास न देणे म्हणजे धोका देणे आहे. याबाबत माहिती दिली असती तर समोरील पक्षास विवाह करायचा किंवा नाही याबाबत निर्णय घेता आला असता, असे मतही कोर्टाने नोंदवले. (हेही वाचा, ऐकावे ते नवलंच! खुर्चीवरून माजला गोंधळ; लग्नानंतर अवघ्या 5 तासांत घटस्फोट, जाणून घ्या Bulandshahr मधील निकाहची अनोखी कहाणी)

फसवणूक करुन सोबत राहणे हा अन्याय

विवाहनंतर एखाद्या व्यक्तीला काही आजार उद्भवला तर ती वेगळी बाब आहे. मात्र, या प्रकरणात तसे काहीच दिसत नाही. त्या उलट आजाराची माहिती लपवून फसवणूक करुनही पतीच्या घरी एक आठवड्यापेक्षा अधिक काळ राहणे हा अन्याय आहे. दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे या विवाहात सलोखाही दिसत नाही. त्या उलट पतीने या विवाहातून मुक्तता मिळविण्यासाठी कायदेशीर पर्याय निवडला आहे. असे कोर्टाने म्हटले.  (हेही वाचा -HC On Mental Strain: आर्थिक मर्यादेबाहेरची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पतीवर दबाव आणणे हे मानसिक तणावाचे कारण; दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण)

या प्रकरणातील जोडप्याने 18 मे 2017 रोजी अकोला येथे विवाह केला. परंतु अवघ्या तीन महिन्यांतच ते वेगळे राहू लागले. पत्नीने वैवाहिक हक्कांची परतफेड करण्यासाठी खटला दाखल केला, तर पतीने क्रूरतेच्या कारणास्तव विवाह रद्द करण्याचा आणि घटस्फोटासाठी खटला दाखल केला. पतीने केलेल्या दाव्यानुसार, पत्नीला जन्मजात ptosis आहे आणि तिचा डावा डोळा झोपेतही नेहमी उघडा राहतो. कोर्टाने पतीचा दावा मान्य करत घटस्फोट कायम ठेवला.