राज्यात सध्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीचे संकट अजूनही संपलेले नाही. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाडा, (Marathwada ) विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळं मराठवाड्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अवकाळी पावसामुळे शेतमालाचेही (Crop Damage) मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतमालाचे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) आर्थिक गणीत बिघडले आहे.
मराठवाड्यातील नांदेडमध्ये गारपीटीची तडाख्यामुळे एका शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात या विभागातील 10 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर 10 जणांचे बळी गेले आहेत. एप्रिलच्या 28 दिवसांपैकी 5 दिवस मध्यम ते जोरदार व इतर 14 दिवसांत हलक्या पावसाची नोंद झाली. एप्रिलमध्ये मराठवाड्यात सरासरी 3.6 मिमी अवकाळी पाऊस अपेक्षित असतो. यंदा प्रत्यक्षात 33.6 मिमी म्हणजे 93.03 टक्के पावसाची विक्रमी नोंद झाली.
लातूरच्या तीन मंडळात 65 मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर नांदेड (28 मिमी), हिंगोली (14.3 मिमी), उस्मानाबाद (13.9 मिमी), बीड (12.7 मिमी), जालना (7.8 मिमी), परभणी (4.9 मिमी), औरंगाबाद (4.9 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसामुळं मराठवाड्यातील 153 गावांना फटका बसला आहे. बाधित झालेल्या 153 गावांमध्ये जालन्यातील 101, हिंगोलीतील 38 आणि उस्मानाबादमधील 14 गावांचा समावेश आहे. नांदेडमध्ये सहा, लातूरमध्ये दोन आणि उस्मानाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.