
Satara News: सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावर (Mandhardevi Mandir) असलेले काळूबाई मंदिर भाविकांसाठी आठ दिवस बंद राहणार आहे. या काळात भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे त्यांना देवीचे दर्शन दुरुनच घ्यावे लागणार आहे. मंदिरातील गाभाऱ्यात दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. समितीने माहिती देताना सांगितले की, 21 ते 28 सप्टेंबर या काळात मंदिर गाभाऱ्यातील प्रवेशासाठी बंद असेल. त्यामुळे भाविकांनी गडावर गर्दी करु नये. ज्या भाविकांना देवीचे दर्शन दूरन घ्यायचे आहे ते गडावर येऊ शकतात.
काळूबाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक मांडरगडावर गर्दी करतात. राज्य आणि देशभरातील असंख्य लोक येथे कुळाचार करण्यासाठीही येथे येतात. ज्या लोकांना कुळधर्म, कुलाचार करायचा आहे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. फक्त त्यांना देवीचे दर्शन दुरुन घ्यावे लागणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठीचे कारागिर आणि मंदिराशी संबंधीत लोक वगळता इतर कोणालाही गाभाऱ्यात जाता येणार नाही, असेही मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने म्हटले आहे.
मांढरदेवी गडावरची काळूबाई नवसाला पावते अशी वदंता अनेकांच्या मनात आहे. त्यात खरे खोटे किती यात कोणतीही स्पष्टता नाही. पण, लाखो लोक श्रद्धेपोटी येथे दाखल होत असतात. खास करुन शाकंबरी पौर्णिमेला मांढरदेवी गडावर भक्तांची गर्दी अधिक असते. सांगितले जाते की या पौर्णिमेला गडावर तब्बल 7 ते 8 लाख भाविक देविच्या दर्शनासाठी दाखल होतात. गडावरचा मार्ग ओलसर आणि निसरडा असतो. त्यामुळे अनेक भाविक या रस्त्यावरुन घसरतात. सन 2005 मध्ये अशाच गर्दीत काही भाविक घसरले आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. ज्यात जवळपास 295 भाविकांचा चिरडून मृत्यू झाला होता.
मांढरदेवी काळूबाई मंदिराची स्थापना कोणी केली याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, अनेक अभ्यासकांनी केलेला दावा आणि हेमाडपंथी शैलीतील बांधकाम पाहता हे मंदिर अतिशय जूने असावे असे सांगितले जाते.