
कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टसोबत, मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे 300 डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी माझा डॉक्टर (Majha Doctor) ही मोहीम सुरु केली, ज्याद्वारे फॅमिली डॉक्टरांना नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले गेले. अशाच रितीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण ‘माझा डॉक्टर’ बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.
लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात, यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरे होण्यास मदत होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो.
आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून, खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावी असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्त्वाचे आहे. (हेही वाचा: शिधापत्रिकाधारकांना धान्याचे मोफत वाटप सुरू; 'या' ठिकाणी पाहू शकाल तुमच्या कार्डावरील अन्नधान्याचा तपशील)
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन, राज्यात बालरोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी या सभेत माहिती देण्यात आली. तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.