वातावरणीय बदल हे जसे मनुष्याला अनुभवावे लागत आहेत तसेच ते प्राण्यांनाही अनुभवावे लागत आहेत. पाण्यात रमणारे डॉल्फिन्सदेखील (Dolphins) त्याला अपवाद नाही. मुंबईच्या एमएमआर भागातील यामुळेच आता पहिल्यांदाच गणना होणार आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्टेट मॅनग्रुव्ह सेलच्या (State Mangrove Foundation) माध्यमातून डॉल्फिनची गणना होणार आहे. मुंबईला लाभलेल्या 150 किमीच्या समुद्राच्या परिसरात डॉल्फिन किती आहेत याची आता गणना होणार आहे.
कोस्टल कंझर्व्हेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये दक्षिण मुंबईच्या भागात सहा समूहांमध्ये एकूण 27 डॉल्फिन आढळले होते. यामधून आता मुंबई नेमके हम्पबॅक डॉल्फिन किती आहेत याची गणना करण्याचा घाट घातला जाणार आहे. मान्सून नंतर या कामाची सुरूवात होणार असल्याची माहिती 'सकाळ' च्या वृत्तामधून समोर आली आहे.
वन्यजीव कायदा 1972 च्या अनुच्छेद 1 अन्वये डॉल्फिनची गणना ही दुर्मिळ प्रजातींमध्ये करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत CCF च्या प्रायोगिक अभ्यासादरम्यान, 6 डॉल्फिनच्या सर्वात मोठ्या गटाचा समावेश होता. विशेष म्हणजे 14 एप्रिल ते 11 मे दरम्यान हाजी अली खाडी ते दक्षिण मुंबईतील राजभवनपर्यंत हा अभ्यास करण्यात आला होता. फोटोग्राफच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अभ्यासात असेही म्हटले आहे की 27 दृश्यांपैकी, 15 दृश्ये बाल आणि उप-प्रौढ डॉल्फिनचा समावेश होता.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन प्रकारचे डॉल्फिन आढळले आहेत. मनोरी, वर्सोवा ते नरिमन पॉइंट भागातही डॉल्फिन दिसले आहेत. सोबतच मरीन ड्राईव्ह ते अलिबाग या भागातही डॉल्फिनचं दर्शन झालं आहे.
डॉल्फिन हे बायोलॉजिकल इंडिकेटर्स आहेत. डॉल्फिनचे वागणं तसेच पर्यावरणासोबतचे राहणीमान हे त्यांच्यावर होणाऱ्या पर्यावरणीय बदलांची परिणामांची एक प्रकारे माहिती देत असतात. त्यामळे या अभ्यासातून आपण काय करू शकतो, या गोष्टीचीही स्पष्टता येणार आहे. अशी प्रतिक्रिया वीरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र मॅनग्रुव्हज सेल यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.