सध्या देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबतची परिस्थिती फारच गंभीर बनत चालली आहे, त्यात महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर आहे. राज्यात कोरोना विषाणूमुळे एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाला असून, 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे हा मृत्युदर (Mortality Rate) संपूर्ण जगात सर्वाधिक असल्याची बाब समोर येत आहे. काल राज्यातील मृत्यूदर 7.41 टक्के इतका होता, अशा प्रकारे महाराष्ट्र हे या जागतिक महामारीचे मृत्यूंच्या बाबतीत भारतातील हॉटस्पॉट बनले आहे.
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मृत्यूदर किंवा मृत्यूंची टक्केवारी ही जगात सर्वाधिक आहे. यामुळेच राज्य व केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांना मोठी चिंता भेडसावत आहे. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीनुसार, 10 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूंची टक्केवारी ही सर्वाधिक आहे. हा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाने संकलित केलेले असून, तो वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग (एमईडीडी) द्वारा विश्लेषित केला आहे.
वाढत्या कोरोना व्हायरसच्या मृत्यूची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी, मुंबईत आणि उर्वरित राज्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समित्यांची स्थापना केली. या लोकांना मृत्यूच्या घटनांची चौकशी करण्यासाठी व त्यावर उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे आणि सहा तज्ञांनी महाराष्ट्रात मृत्यूची संख्या कशी कमी करावी यासाठी सरकारला सल्ला द्यावा, असे टोपे यांनी सांगितले आहे.
नवीन 32 लोकांच्या मृत्यूसह आणि एकूण 338 रुग्णांसह भारतीय सरासरी मृत्यु दर फक्त 3.27 टक्के आहे. जगात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,773,084 इतकी नोंदवली गेली, तर भारतामध्ये 10,369 आणि महाराष्ट्रात 2, 684 नोंद झाली आहे. 13 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मृत्युदर 7.41 टक्के होता, 12 एप्रिल रोजी 7.21 टक्के, तर 10 एप्रिल रोजी 7.11 टक्के इतका होता. (हेही वाचा: भारतात कोरोना विषाणूचे थैमान; गेल्या 24 तासात 29 लोकांचा मृत्यू, तर 1 हजार 463 नव्या रुग्णांची नोंद)
दरम्यान, भारतामध्ये पहिल्या चार आठवड्यांमध्ये केवळ तीन कोरोना व्हायरस प्रकरणे होती, जी आठव्या आठवड्यात 724 झाली. 11 व्या आठवड्यात यामध्ये 10 पटपेक्षा वाढ होऊन ती 7447 झाली. त्या तुलनेत अमेरिकेचा प्रवास पहिल्या आठवड्यात 11 प्रकरणांसह, 12 व्या आठवड्यात 395,030 पर्यंत पोहचला. इटलीमध्ये पहिल्या आठवड्यात तीन रुग्ण होते, ते दहाव्या आठवड्यात 147,577 इतके झाले. स्पेनमध्ये पहिल्या आठवड्यात एक प्रकरण होते ते 10 व्या आठवड्यात 152,446 वर पोहचले.