
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामानात खूप बदल झाले आहेत. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवला तर सध्या काही ठिकाणी पावसाची रिमझिम चालू आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देशभरात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामध्ये पाऊस, गारपीट आणि तापमानात चढउतार यांचा समावेश आहे. मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्र वारे वाहतील, ज्यामुळे अनेक भागात पाऊस पडेल.
पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील सुमारे बारा जिल्ह्यांना बुधवारी यलो अलर्ट देण्यात आला होता. अंदाजानुसार, उद्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट आणि वेगवान वारेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, आणि धुळे या भागांत हा बदल अधिक जाणवेल. मुंबई आणि पुणे या शहरांमध्येही आकाश ढगांनी भरलेले असेल, आणि दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हा पाऊस गेल्या काही दिवसांपासून 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या उष्णतेला काहीसा ब्रेक देईल.
हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अंतर्गत भागात जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. वातावरणातील उच्च तापमान आणि आर्द्रतेचा संगम, यामुळे हा बदल घडत आहे. यामुळे हवेत अस्थिरता निर्माण झाली आहे, आणि त्यातूनच ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरींची शक्यता वाढली आहे.
पालघर, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, संभाजीनगर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल.
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, या ठिकाणी गडगडाटासह मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा असेल.
अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट/गडगडाटी वादळाची शक्यता आहे. (हेही वाचा: Mental Health Crisis: प्रदूषित हवा शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्याही हानिकारक; अनेकजण नैराश्याच्या गर्तेत)
दरम्यान, मुंबईकरांसाठी हा बदल आनंददायी ठरू शकतो, कारण उष्णता आणि उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाच्या सरी थंडावा देतील. पण विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागात गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहावे लागेल. या हवामानामुळे काही ठिकाणी झाडे पडण्याची किंवा वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा पाऊस किती काळ टिकेल, याबाबत अजून स्पष्ट माहिती नाही. पण 3 एप्रिल रोजी राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.