सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. निकालाचा कल पाहता जनतेचा कौल भाजपला असलेला दिसून येत आहे. मात्र यासोबत राज्यातील अनेक हाय व्होल्टेज लढतीदेखील निकालाचे तापमान वाढवत आहेत. सध्याच्या निकालानुसार परळी आणि सातारा येथील निकाल फार धक्कादायक आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी युतीसाठी फार मोठे आव्हान उभे करत आहे. मात्र अजूनतरी संपूर्ण निकाल हाती आलेलेला नाही, त्यामुळे कोणत्याही क्षणी बाजी पलटू शकते.
दरम्यान महाराष्ट्रात अनेक VVIP जागा आहेत ज्यांच्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागांसह सातारा, वरळी, परळी, बीड, कणकवली यांचा समावेश होतो. चला नजर टाकूया या जागांवरील आघाडी-पिछाडीवर
नागपूर दक्षिण पश्चिम -
या जागेचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आहेत. सध्याच्या निकालानुसार त्यांनी आशिष देशमुखला यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे.
कराड दक्षिण -
या जागेवर माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवित आहेत. सध्याच्या निकालानुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. सध्या भाजपचे अतुलबाबा सुरेश भोसले यांच्यासह अन्य 11 अपक्ष उमेदवार पिछाडीवर आहेत.
भोकर -
येथून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण आणि भाजपाचे श्रीनिवास उर्फ बापुसाहेब देशमुख गोर्तेकर यांच्यात संघर्ष आहे. सध्याच्या निकालानुसार अशोक चव्हाण यांनी मोठ्या मतांनी आघाडी घेतली आहे.
बारामती –
अजित पवार हे पवार घराण्याच्या पारंपारिक जागेवरुन रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात गोपीचंद कुंडलिक पडळकर यांच्या रूपात भाजपाने एक मजबूत उमेदवार दिला आहे. मात्र इथला निकाल आता स्पष्ट होत असून, अजित पवार आघाडीवर आहेत. (हेही वाचा: परळी: भावा-बहिणीच्या लढतीमध्ये जनतेची धनंजय मुंडेंना साथ; पंकजा ताईंचे भावनिक राजकारण ठरू शकते कुचकामी)
सातारा -
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केल्यात जमा आहेत. तब्बल 20 हजार पेक्षा जास्त मतांनी उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत.
परळी –
राज्यात परळीचा निकाल एक धक्कादायक निकाल म्हणून पाहता येईल. परळी येथे भावा-बहिणीमध्ये जी काट्याची टक्कर होत यामध्ये धनंजय मुंडेंनी प्रचंड मतांनी आघाडी घेतली आहे.
बीड –
बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये लढाई पाहायला मिळत आहेत. सध्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना पिछाडीवर टाकले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 जागा मिळवणे आवश्यक असते. भाजपने तोडफोडीचे राजकारण करत हा आकडा गाठावा यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार यांच्या प्रचार सभांच्या धडाडलेल्या तोफांनी युतीला चांगलीच टक्कर दिली आहे.