सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Maharashtra Assembly Election Result 2019) लागले आहे. निकालाचा कल पाहता जनतेचा कौल भाजपला असलेला दिसून येत आहे. मात्र यासोबत राज्यातील अनेक हाय व्होल्टेज लढतीदेखील निकालाचे तापमान वाढवत आहेत. सध्याच्या निकालानुसार परळी आणि सातारा येथील निकाल फार धक्कादायक आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये तब्बल 15 हजार मतांनी उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे परळी येथे मुंडे भावा-बहिणीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र इथे पंकजा मुंडेंची ‘भोवळ’ कुचकामी ठरत, धनंजय मुंडे यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहेत.
परळी येथील मत मोजणीची अकरावी फेरी पार पडली आहे यामध्ये पंकजा मुंडे यांना पिछाडीवर टाकत, धनंजय मुंडेंनी आघाडी घेतली आहे. धनंजय मुंडेंनी सातत्याने आपली आघाडी कायम ठेवत ते अठरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. या निकालामुळे धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून, परळीत जल्लोषाला सुरुवात झाली आहे. दुपारी साडेबारा-एक पर्यंत परळीमधील निकालाचे चित्र स्पष्ट होईल. परळी येथील लढाई ही राष्ट्रवादी-भाजपमधील नव्हती तर, ती भावा- बहिणीमधील होती, ही लढाई पंकजा ताई हरताना दिसत आहे. दरम्यान निवडणुकीआधीच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून राज्यात गदारोळ माजला होता. या प्रकरणाबाबत भावनिक होऊन लोकांची सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेनी केला, मात्र त्यांचा प्रयत्न सपशेल फेल गेल्याचे दिसत आहेत.
(हेही वाचा: साता-याचे उदयनराजे भोसले 32,000 मतांनी पिछाडीवर, पक्षबदल करणे पडू शकते महागात)
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 जागा मिळवणे आवश्यक असते. भाजपने तोडफोडीचे राजकारण करत हा आकडा गाठावा यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार यांच्या प्रचार सभांच्या धडाडलेल्या तोफांनी युतीला चांगलीच टक्का दिली आहे.