मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local Train) म्हणजे या शहराच्या वाहिन्या. लोकल ट्रेन (Local Train) बंद म्हणजे मंबई बंद. त्यामुळे कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) काळात मुंबई लोकल पूर्णपणे बंद आहेत. नाही म्हणायला अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या जेवढ्या फेऱ्या होतात इतकेच. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेन कधी सुरु होतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मुंबई लोकल लवकर सुरु करा अशीही मागणी होत आहे. दरम्यान मध्य रेल्वे कार्यालयाने आज महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मध्य रेल्वे मुंबई लोकल सुरु करण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्य सरकारने परवानगी देणे आवश्यक आहे.
मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांच्या हवाल्याने एबीपी माझा या वृत्तावहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य रेल्वे मुंबई लोकल सुरु करण्यास तयार आहे. मात्र, राज्य सरकारने त्यासाठी परवानगी द्यायला हवी आणि तशी मागणी करायला हवी, असे रेल्वेने म्हटले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात 1 सप्टेंबरपासून व्यायाम शाळा, मंदिर सुरु होणार? राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष)
दरम्यान, मुंबई लोकलमधून प्रवास करताना गर्दी होणार हे निश्चित. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलायला हव्यात. जेणेकरुन सोशल डिस्टंन्सींगचे पालन होईल आणि गर्दीही टाळली जाईल. मुंबई रेल्वे त्यासाठी आग्रही आहे. लवकरच राज्य सरकार, महापालिका यांच्याशी चर्चा केली जाईल असेही रेल्वेने म्हटले आहे.