राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत विविध निर्णय (Maharashtra State Cabinet Decision) घेण्यात आले. या बैठकीत प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत, राज्याच्या कृषी पर्यटन धोरणास मान्यता, नागपूर विभागातून पूरग्रस्तांना वाढीव दराने तातडीने मदत, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यासोबतच उल्हासनगर महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी जमीन देणे यासारखे महत्त्वूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पार पडलेले निर्णय (Cabinet Decision) खालील प्रमाणे
उल्हासनगर महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी जमीन देणे
उल्हासनगर महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मौजे उसाटणे येथील 11.5 हेक्टर शासकीय जमीन देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (हेही वाचा, मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे घरोघर आरोग्य मोहीम राबवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत
राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळून ती निवड मंडळांमार्फत भरण्याचा कालावधी वाढविण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा कालावधी ३१ मार्च 2020 पर्यंत होता तो आता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
राज्याच्या कृषी पर्यटन धोरणास मान्यता
राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आणि नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागपूर विभागातून पूरग्रस्तांना वाढीव दराने तातडीने मदत
नागपूर विभागात 30-31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे तातडीची मदत म्हणून 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. या संदर्भात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून खर्च करण्यास आणि वाढीव दराने मदत देण्यासाठी होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा व शिवणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे उपनद्यांना पूर येऊन ही परिस्थिती निर्माण झाली.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविणार
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असून आज मंत्रिमंडळ बैठकीत याचे सादरीकरण प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य यांनी केले.