‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ (My Family My Responsibility) या राज्यस्तरीय अभियानाच्या माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य आहे. अनलॉकनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चित काळजीची गोष्ट असली तरी, मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर यावर खात्रीपूर्वक मात करण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray)यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची संख्या वाढवून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. मुंबईतील महापालिका उपायुक्त, वॉर्ड अधिकारी, डॉक्टर्स, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व पालिका अधिकाऱ्यांच्या सह्याद्री अतिथीगृहात शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव, सार्व. आरोग्य विभाग प्रदीप व्यास, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारसू आदी पदाधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा - सांगली: आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्यासह कुटुंबातील तिघांना Coronavirus संसर्ग)
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत आहे, हे लक्षात घेवून कोरोना साथ नियंत्रणाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी गणपती, मोहरम अत्यंत संयमाने साजरे केले इथून पुढेही हाच संयम नागरिकांनी बाळगावा.
चेस दि व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित आहोत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करुन घ्या, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.