सध्या राज्यातील कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामध्ये जरी घट होत असली तरी, धोका अजूनही पूर्णपणे टळला नाही. अशात प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मुलांना शाळेत पाठवायचे का नाही याबाबत मोठा संभ्रम पालकांसमोर आहे. आता पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसेल, असे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जो योग्य वाटेल तो निर्णय घेऊन त्यांना शाळेत पाठवावे की नाही हे ठरवावे.
ज्यांना वाटते त्यांनी धोका पत्करू नये. उद्या शाळा सुरू होणार असल्या तरी असल्या तरी शाळा आणि पालक दोघांनी मिळून भविष्यातील कृती ठरवायची आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. दुसरीकडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले की, ‘राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करावी आणि जर कोणताही विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळला तर तो वर्ग बंद ठेवावा.’ (हेही वाचा: Safe School Zone: मुलांच्या सुरक्षेसाठी बीएमसीने राबवला नवा प्रकल्प, जाणून घ्या या सेफ स्कूल झोन विषयी)
महाराष्ट्रातील 62 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे लोकल सर्कलच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या निष्कर्षांवर टोपे म्हणाले की, सरकारने जागतिक अनुभवाचा अभ्यास करून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व-प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे. पालक, शिक्षक संघटना आणि शिक्षण तज्ञांच्या मागणीनुसार राज्य मंत्रिमंडळाने शाळा पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर आदित्य ठाकरे आणि राजेश टोपे यांची विधाने समोर आली आहेत.
दरम्यान, मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रथमच त्यांचे वडील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल मौन सोडले. उद्धव ठाकरे यांनी साथीच्या आजाराच्या वेळी घरून काम केल्याबद्दल आणि गेल्या वर्षी यांच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर विरोधकांच्या वारंवार होत असलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत आणि ते लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील. आरोप करणे आणि जनतेची दिशाभूल करणे हे विरोधकांचे काम आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे.’