Maharashtra Scholarship Exam 2021 New Date: 5वी, 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत पुन्हा बदल; आता 'या' दिवशी होणार परीक्षा
Exam | Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

MSCE Pune Scholarship Exam: कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) राज्यातील अनेक परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा परिणाम पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेवरही (Scholarship Exam) झाला असून याच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 9 ऑगस्ट रोजी होणार होती. दरम्यान, यापूर्वीही दोनदा शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र शिक्षण विभागाच्या पत्रानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही परीक्षा 23 मे रोजी होणार होती, मात्र कोविड-19 ची दुसरी लाट लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्यात आली. (Maharashtra Scholarship Exam 2021 Postponed: महाराष्ट्रात 23 मे ला होणारी 5वी, 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर; लवकरच जाहीर होणार परीक्षेची नवी तारीख)

दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला पाचवी आणि आठवीचे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी बसतात. परंतु, यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील सुमारे 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये 3 लाख 88 हजार 335 पाचवीच्या वर्गातील आहेत तर 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थी आठवीचे आहेत.

स्कॉलरशीप परीक्षेमध्ये भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विषयांची परीक्षा होते. प्रत्येकी 100 गुणांचे 3 पेपर्स एकाच दिवशी असतात. यात प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्न असतात. या परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करुन त्यात स्कॉलरशीप धारक विद्यार्थ्यांची घोषणा करण्यात येते.