Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या दुसर्‍या लाटेची तीव्रता पाहता राज्य शिक्षण मंडळाने 10वी च्या परीक्षा रद्द करत 12 वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. आता या पाठोपाठ इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा देखील लांबणीवर टाकल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज त्याबद्दल माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेता 23 मे ला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) आता लांबणीवर टाकण्यात येत आहे. लवकरच या परिक्षेसाठी नवी तारीख जाहीर केली जाईल असे देखील म्हटलं आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी यंदाची स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 25 एप्रिल 2021 रोजी आयोजित केलेली होती मात्र कोरोना वायरस संकटामुळे ती 23 मे दिवशी होणार आहे. असे सांगण्यात आले होते पण आता पुन्हा कोरोना संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

वर्षा गायकवाड ट्वीट

यंदा राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण47,662 शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता 5 वीचे 3,88,335 तसेच इयत्ता 8 वीचे 2,44,143 असे एकूण 6,32,478 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पण कोविड मुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान यंदा 1ली ते 9 वी च्या सार्‍या विद्यार्थ्यांनाही परीक्षेविना वर्गोन्नती देण्याचा निर्णय झाला आहे.

स्कॉलरशीप परीक्षेमध्ये भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विषयांच्या प्रत्येकी 100 गुणांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर राज्यभरातून अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून स्कॉलरशीप धारकांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्नावली असते. सार्‍या विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.