महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे व यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माहितीनुसार, 12 छोटे राजकीय पक्ष I.N.D.I.A आघाडीत सामील होऊ शकतात. इंडिया टीव्हीन्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. या 12 पक्षांमध्ये शेतकरी आणि कामगार पक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांचा पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे. मात्र याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
महाराष्ट्रातील या 12 छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीसोडून स्वतःचा गट तयार केला होता आणि भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. नुकतेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या गटाशी संपर्क साधून इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईमध्ये होणार असून, ही सभा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा एक गट तयार करण्यात आला आहे. या गटात एकूण 18 नेते आहेत.
महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षातील 6 नेत्यांना या गटात स्थान देण्यात आले आहे. सुपर 18 मध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अशोक चव्हाण, नाना पटोले आणि जयंत पाटील हे प्रमुख नेते आहेत. मुंबई बैठकीचे सूत्रसंचालन करण्यासाठी काँग्रेसने स्थापन केलेल्या कोअर ग्रुपचे सदस्य नसीम खान यांनी, महाविकास आघाडी ही इंडियाच्या मुंबई बैठकीचे यजमान असल्याचे म्हटले आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. (हेही वाचा: INDIA Alliance मुंंबईतीलबैठकीत करणार लोगोचे अनावरण, नाना पटोले यांची माहिती)
महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेनुसार मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीत आणखी अनेक पक्ष सहभागी होणार आहेत, असल्याचीही माहिती समोर येत आहे. हे सर्व पक्ष भारताला वाचवण्यासाठी एकत्र येत असल्याचे सांगण्यात आले. मुंबईच्या सभेत कोणताही झेंडा सादर केला जाणार नाही, मात्र नव्या महायुतीच्या लोगोचे अनावरण होणार आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे.