महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा न्यायनिवाडा आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. जून 2022 पासून सुरू असलेल्या या प्रकरणामध्ये आता न्यायदेवता कुणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. दोन्ही पक्षाकडून कायद्याचा किस पाडला जात असताना अंतिम निर्णय काय असेल याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. हरिश साळवेंपासून नीरज कौल, अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांनी न्यायालयीन लढाई लढली आहे. त्यामुळे आता सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठ काय निकाल देणार याची उत्सुकता वाढली आहे.
घटनापीठासमोरील सलग सुरू असलेल्या सुनावणीमध्ये आता आज सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही पक्षाकडून दावे- प्रतिदावे केल्यानंतर 5 जणांचे खंडपीठ या महत्त्वपूर्ण घटनेवर आपला निर्णय देणार आहे. दरम्यान शिवसेना पक्षामध्ये झालेली फूट, त्यानंतर आमदारांच्या आमदारकीचं भवितव्य आणि त्यासोबतच नव्याने स्थापन झालेलं सरकार यांचं भवितव्य यावर काय निर्णय होणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी फूट नसली तरी अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण फूटीनंतर शिंंदे गटाकडे राहील असा निर्णय दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कुणाच्या बाजूने निकाल लागेल याची उत्सुकता देखील वाढत आहे.
सर्वोच्च न्यायालय आजच्या निर्णयानंतर पुढील तारीख देऊन निकाल राखून ठेवण्याची दाट शक्यता आहे. होळीच्या सुट्टीनंतर निकाल लागू शकतो. दरम्यान या निकालावर अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत. मागील 8 महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी तारीख पे तारीख सुरू होती.