पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: PTI)

महाष्ट्रात सध्या कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येत जवळच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसत आहे. यातच बीड येथील लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मोठा गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हेतर, जिल्ह्याचे डीव्हायएसपी संतोष वाळके यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर बेछूट लाठीमार केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

बीडमध्ये शासकीय रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढत चालल्यामुळे काहीसा गोंधळ झाला. यावेळी बीडचे पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस दल आक्रमक झाले. पोलिसांनी नागरिकांवर बेछूट लाठीमार केला. बीडच्या शासकीय रुग्णालयात घुसून पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्ज करतानाची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पाच ते सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरुच; तडीपार गुंडाकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या, कारण अस्पष्ट

याआधीही बीडमधील परळीत लसीकरण केंद्रावर नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अवघ्या तीस लसी उपलब्ध असताना केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिन्गचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. ज्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.