महाराष्ट्र: राज्यात लॉकडाउनच्या काळात 20,626 जणांना अटक तर 58 हजारांपेक्षा अधिक वाहने पोलिसांकडून जप्त- अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. खासकरुन महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता तरी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाउनच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. मात्र राज्यातील काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे आढळून येत असून त्यांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान आता राज्यात लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 20,626 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 58 हजार,568 वाहने पोलिसांकडून वाहने जप्त केली आहेत.

नागरिकांनी लॉकडाउनचे नियम पाळावेत यासाठी पोलीस दलातील कर्मचारी अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु तरीही काही नागरिक लॉकडाउनच्या नियमांकडे दुर्लक्ष करत घराबाहेर पडत असून विनाकारण मोकाट फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून कलम 188 अंतर्गत 1,08,479 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 4,36,74,894 रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल केली आहे. ऐवढेच नाही तर राज्य सरकारने पोलिसांवर हल्ले केल्यास कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा दिला आहे.(Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित तुमच्या शहरात COVID19 चे किती रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घ्या)

 महाराष्ट्रात कोरोनाबाधितांसह बळींचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश येत्या 31 मे पर्यंत लागू करण्यात येणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा वेग संथ करण्यास आपल्याला यश आले असून त्याची साखळी तुटली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी राज्यातील विविध ठिकाणी कोविड सेंटरसह विलगिकरण कक्षांची उभारणी करण्यात येत आहे.