महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पूर्णपणे हादरवून सोडणारी घटना आज घडली. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनामाच्या मागणी जोर धरून होती. त्यावर अखेर आज पडदा पाडत अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: ट्विटच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा देत आपले राजीनामा पत्र प्रसिद्ध केले आहे. सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंह लेटर बॉम्ब प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून गेले. त्यानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर आज बॉम्बे हाय कोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 15 दिवसांत ही चौकशी करून काही चूक आढळल्यास एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. "सीबीआय चौकशीचे आदेश असताना पदावर राहणं उचित नसल्याचं" सांगत त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र या सर्व प्रकारास मुख्य कारण ठरले असे म्हणता येईल. परमबीर सिंह यांची बदली गृहरक्षक दलामध्ये करण्यात आली आहे. अनिल देशमुखांनी एका कार्यक्रमात बोलताना परमबीर सिंह यांच्याकडून काही अक्षम्य चूका झाल्याचं सांगण्यात आले आणि त्यामुळे त्यांची उचलबांगडी होत असल्याचं म्हटलं आहे.
यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे आरोप केले आहेत. तसंच मुंबईत 1750 हून अधिक बार, रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये घेतले तरी महिन्यात 40-50 कोटी जमा होतील. याखेरीज उर्वरित रक्कम इतर ठिकाणाहून वसूल करण्यास सांगितले होते. या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीमधून सध्या राज्यात राजकारण देखील तापले.
यामुळे परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर सुरूवातीला सर्वोच्च न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयात सिंह यांनी सीबीआय चौकशी साठी याचिका दाखल केली. सिंह यांची याचिका फेटाळली गेली असली तरीही आज Dr Jaishri Patil यांची Writ Petition मान्य करत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.हेदेखील वाचा- Anil Deshmukh यांनी दिला महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा;CBI चौकशीच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या पदापासून दूर जाण्याचा निर्णय
दरम्यान आज स्वत: अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना देऊन "CBI चौकशी होईपर्यंत या पदावर नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत: या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेत आहे." असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. तसेच "मला गृहमंत्रीपदावरून कार्यमुक्त करावे" असेही ते या पत्रात म्हणाले.