राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसिवीरच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरु; मंत्री राजेंद्र शिंगणे यांची माहिती
Remdesivir (Photo Credits: ANI)

राज्यातील कोविड19 (Covid-19) रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे डळमळीत झालेली आरोग्य यंत्रणा यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection)  आणि ऑक्सिजनच्या (Oxygen) अपुऱ्या साठ्यामुळे त्रस्त आहेत. परंतु, ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत नियोजन सुरु करण्यात आले आहे.

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात करण्यासाठी तसंच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत योग्य नियोजन सुरु आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. (Oxygen Concentrators नेमकं काम कसं करतं? कोविड 19 रूग्ण त्याचा वापर कसा, कधी करू शकतो?)

राज्यात उत्पादीत होणारा आणि इतर राज्यातून मिळणारा ऑक्सिजन सर्व जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार मिळावा, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं, दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा याबाबतचं विवरणपत्र तयार करून ते राज्यातल्या ऑक्सिजन उत्पादकांना देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काल 1 हजार 695 टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्रातून सूचना दिल्या आहेत.

राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोपरी प्रयत्न करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यासाठी 21 एप्रिल 2021 ते 9 मे 2021 या कालावधीसाठी एकूण 8 लाख 9 हजार एवढा कोटा मंजूर केला असून येत्या काही दिवसात राज्यासाठी अधिक रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रेमडेसिवीरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून केंद्राच्या निर्देशांनुसार 30 एप्रिलपर्यंत 3 लाख 44 हजार 494 इतका साठा शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना वितरित झाला आहे, अशी माहिती शिंगणे यांनी दिली.