महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्याच्या एका महिन्यानंतर अखेर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तर दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच ठाकरे सरकारमधील अन्य सहा नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शनिवारी पार पडलेल्या विधानभवनात प्रथम अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरले गेले. त्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच विधानभवनाच्या सभागृहात ठाकरे सरकारने 169 आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे दाखवत बहुमत सिद्ध केले. या दरम्यान भाजपने मांडलेले मुद्दे विधानभवनाच्या हंगामी अध्यत्र दिलीप वळसे यांनी फेटाळून लावल्याने भाजपकडून सभात्याग करण्यात आला.
मात्र आज विधानभवनात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक छुप्या पद्धतीने म्हणजेच बॅलेट पेपरने घेण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. परंतु हंगामी अध्यक्षांनी ही निवडणूक सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर भाजपकडून किसन कथोरे यांच्या विरोधात काँग्रेसकडून नाना पटोले यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. विधानभवनाचे कामकाज आज 11 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडे विधानसभाध्यक्षपद जाणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.(राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती)
शनिवारी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात सुरुवातीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारने घेतलेली शपथ ही संविधानाच्या नियमाच्या विरोधात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच देशाच्या इतिहासात आजवर हंगामी अध्यक्ष कधीच बदलला गेला नाही असे ही म्हणत त्यांनी नव्या ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. अखेर सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपने सभात्याग केला. परंतु आज होणाऱ्या विधानसभागृहाच्या अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे.