Maharashtra Government Formation: उद्धव ठाकरे यांचे सरकार 3 डिसेंबरला नाही तर 30 नोव्हेंबरला करणार बहुमत चाचणी
उद्धव ठाकरे (Photo Credits-Twitter)

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्री (CM) पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. याच पार्श्वभुमीवर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नव्या सरकारला 3 डिसेंबरला कालावधी देण्यात आला होता. मात्र आता उद्याच बहुमत चाचणी (Floor Test) होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकासआघाडी शनिवारी बहुमत चाचणी करण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या समोर अडचणी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार उपमुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस दरम्यान हालचाली वाढल्या आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांना खुश ठेवण्यासाठी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांचे नाव आघाडीवर आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तिन्ही पक्षाची कमान कशी सांभाळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दरम्यान विविध कराराबाबत बोलले जात असले तरीही आतमधल्या आतमध्ये भलतेच काही सुरु आहे. असे सांगितले जात आहे की, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पीकर पद घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री आणि एक अतिरिक्त मंत्री पदाची मागणी केली आहे.(उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, मंत्रालयात प्रशासनाची लगबग सुरु)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागून 1 महिन्यापेक्षा अधिक दिवस उलटल्यानंतर महाराष्ट्राला महाविकासआघाडीचे नवे सरकार मिळाले आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने अधिक जागा मिळवल्या असूनही मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद झाले. दोन्ही पक्षही त्यांच्या एकमतावर ठाम असल्यामुळे 30 वर्षापासून असलेली युती अखेर तुटली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे.