Maharashtra Flood: केंद्रीय मंत्री दुर्घटनाग्रस्त स्थळी ‘पर्यटन’ करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात; शिवसेना मुखपत्रातून विरोधकांना टोला
Devendra Fadnavis | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापूरामुळे (Maharashtra Flood) अनेक ठिकाणी एकच हाहाकार उडाला. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. चिपळून, कोल्हापूर, महाड अशी अनेक शहरे, गावे पाण्यात गेली. त्यामुळे राज्यभरात बचाव, मदत आणि पूसर्वसन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. अशात राज्यातील विरोधी पक्षांसह अनेक नेते दौरे करत आहेत. त्यातून प्रशासनास यंत्रण राबविण्यात अडथळा येत आहे. यावरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Daily Saamana Editorial) संपादकीयातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. “केंद्रीय मंत्री दुर्घटनाग्रस्त स्थळी ‘पर्यटन’ करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात व मुख्यमंत्री, सरकारी यंत्रणांवर लाखोली वाहून निघून जातात हे कसलं लक्षण समजायचं?”, ''केंद्र सरकार हे राज्याराज्यांचे मायबाप आहेच. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही, पण राज्याच्या लोकनियुक्त सरकारला आम्ही मानत नाही ही भूमिका राज्याच्या हिताची नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारविषयी तक्रारीचा सूर लावलेला नाही. असे असतानाही, ‘आमचा बाप दिल्लीचा’ ही भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेणे कितपत योग्य आहे?'' असा सवाल शिवसेना मुखपत्रातून (Shiv Sena Mouthpiece) उपस्थित करण्यात आला आहे.

'आता राजकीय पर्यटन नको' या मथळ्याखाली लिहीलेल्या लेखात शिवसेनेने म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. ते थांबले तर मदत आणि पुनर्वसन कार्यास अधिक गती येईल. सुरुवातीला जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले, पण या अडथळय़ांतून सरकारी यंत्रणा मार्ग काढीत असतानाच ‘राजकीय पर्यटना’ने यंत्रणेलाच धारेवर धरायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे ‘वि. प. ने.’ दरेकर व माजी मंत्री महाजन हे धावाधाव करीत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळ्या खाव्या लागल्या व सरकारी यंत्रणेस होड्या वगैरे घेऊन त्यांना वाचवावे लागले. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस त्यांचा फौजफाटा घेऊन तळियेत पोहोचले. आता महाराष्ट्राचे महामहिम राज्यपालही तेथे निघाले आहेत. तिकडे मदतकार्य सुरू आहे. सरकारी यंत्रणा या कामात गुंतली आहे आणि इथे अशा या पर्यटनाने गोंधळात गोंधळ वाढत आहे. पुन्हा या अशा राजकीय पर्यटनाचे गांभीर्य किती व फोटोबाजी किती हा प्रश्न आहेच. तळिये गावाचे पुनर्वसन करू, त्यांना ‘म्हाडा’तर्फे घरे बांधून देऊ, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. किंबहुना तळिये गावच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली जागाही उपलब्ध होत असून म्हाडाचे अभियंते त्यादृष्टीने पाहणीही करणार आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी तळियेत केंद्रीय मंत्री गेले व जाहीर केले की, ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देऊ. प्रश्न आव्हाड घरे बांधून देतील की केंद्राच्या मदतीने राणे, हा विषय नाही. या संकटसमयी सरकारविरोधकांनी मढ्यावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये हेच सांगणे आहे.” (हेही वाचा, Shiv Sena on BJP Government: 'पेगॅसस'चे बाप कोण? केंद्राच्या संमतीशिवाय हे होऊच शकत नाही, शिवसेनेचा केंद्र सरकारवर हल्ला)

‘आमचा बाप दिल्लीचा’

“तौक्ते’चक्रीवादळात केंद्राने गुजरातला एक हजार कोटींची मदत केली. तशी मदत महाराष्ट्राला करावी व महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्र्यांनी या रकमेचा धनादेश केंद्राकडून घेऊन यावा. ‘नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, आम्ही पाहायला आलो नाही, सर्वतोपरी मदतही देणार!’ असे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत व त्यांचे हे विधान समजदार नेत्याचे नाही, पण आम्ही ते चांगल्या अर्थाने घेतो. नुकसानग्रस्तांना, पूरग्रस्तांना सर्वतोपरी केंद्र सरकार मदत करेल, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने करावे का? केंद्र सरकार हे राज्याराज्यांचे मायबाप आहेच. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही, पण राज्याच्या लोकनियुक्त सरकारला आम्ही मानत नाही ही भूमिका राज्याच्या हिताची नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारविषयी तक्रारीचा सूर लावलेला नाही. असे असतानाही, ‘आमचा बाप दिल्लीचा’ ही भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेणे कितपत योग्य आहे?”, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने विरोधीपक्षाच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे.

दरम्यान, “महाराष्ट्रातील दुर्घटनेत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केलाच आहे. नौदलाची पथके, एन.डी.आर.एफ. युद्धपातळीवर काम करीत आहे. हे कोणीच नाकारत नाही. पंतप्रधान मोदींपासून गृहमंत्री, संरक्षणमंत्री मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने त्याचे भान ठेवले तरी पुरे. केंद्रीय मंत्री दुर्घटनाग्रस्त स्थळी ‘पर्यटन’ करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात व मुख्यमंत्री, सरकारी यंत्रणांवर लाखोली वाहून निघून जातात हे कसले लक्षण समजायचे? सध्याच्या पूरसंकटाच्या काळात केंद्र आणि राज्यात समन्वय आणि संयमाची गरज आहे. चिपळूणच्या बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. ज्यांनी निसर्गकोपात सर्वस्व गमावले त्यांच्या संतापाचा स्फोट झालाच तर राज्यकर्त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. व्यापाऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांचा विचार झाला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात, तांत्रिक अडचणी मदतकार्याच्या आड येऊ देणार नाही. तर विरोधी पक्ष म्हणतोय, कुठल्याही निकषांशिवाय तत्काळ मदत जाहीर करावी”,असेही शिवसेना म्हणते.