Fruits (Photo Credits: Facebook)

मागील वर्षी कोविड-19 (Covid-19) संकटाचा फटका इतर उद्योगधंदे, व्यवसायांप्रमाणे शेतकऱ्यांनाही (Farmers) बसला. त्यातच फळांचं उत्पादन अधिक प्रमाणात झाल्यामुळे फळांचे भाव पडले. मात्र एकामागोमाग एक आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी राज्यातील बळीराजाने एक नवा उपक्रम सुरु केला आहे. फ्रुटकेक (Fresh Fruit Cake) ही नवी चळवळीचा बळीराजाने आरंभ केला आहे.  काय आहे ही चळवळ? जाणून घेऊया...

वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस किंवा इतर कोणत्याही सेलिब्रेशनच्या क्षण केक कापण्याचा ट्रेंड सध्या सुरु आहे. हाच धागा धरत शेतकऱ्यांची फ्रुटकेक चळवळ उभी राहिली आहे. दरम्यान, आनंदाच्या क्षणी आपण मैदा, रवा किंवा बाजारात उपलब्ध असलेले केकचे अनेक पर्याय अगदी आवडीने आणतो. त्याऐवजी शेतातल्या ताज्या फळांपासून तयार केलेला 'फ्रुट केक कापा आणि कार्यक्रम साजरा करा', अशी ही चळवळ आहे. यासाठी कलिंगड, टरबूज, द्राक्षं, केळी, संत्रा, अनननस या फळांचा वापर करण्यात येत असून हे केक दिसायलाही आकर्षक आहेत. प्रथम सर्व फळ उत्पादक शेतकरी कुटुंबांनी या केकच्या वापरातून सेलिब्रेशनला सुरुवात केली. याचा फायदा फळविक्रीला झाला आणि त्यातूनच फ्रुट केक चळवळीचा जन्म झाला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रुटकेक वापरण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीला राज्यात व्याप्त स्वरुप प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. स्वयंसेवी संस्था फ्रुट केक तयार करण्याची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करत आहेत. तर काही ठिकाणी फ्रुट केक शॉपी सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.